ही योजना राबविण्यात धुळे मनपा राज्‍यात दुसऱ्या क्रमांकावर...

निखिल सूर्यवंशी
Friday, 31 July 2020

लिंकद्वारे स्वतः किंवा सेतू केंद्रामार्फत ऑनलाइन अर्ज भरणे आवश्‍यक आहे. योजनेचा मुंबईस्थित नगर परिषद प्रशासन संचालनालयाच्या माध्यमातून महापालिका क्षेत्रात लाभ देण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.

धुळे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून पथविक्रेत्यांसाठी प्रधानमंत्री स्वनिधी योजना राबविली जात आहे. तिची शहरात अंमलबजावणी सुरू झाली आहे. यात आतापर्यंत महापालिकेतर्फे ऑनलाइन ९११ अर्ज भरण्यात आले आहेत. या प्रक्रियेत येथील महापालिका राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. 
योजनेत पथविक्रेत्यांना बँकेमार्फत खेळते भांडवल म्हणून दहा हजारांचे कर्ज दिले जात आहे. त्याची नियमित परतफेड केल्यास ७ टक्के व्याज अनुदान दिले जाणार आहे. डिजिटल व्यवहार करणाऱ्यास काही प्रमाणात कॅशबॅक मिळणार आहे. त्यासाठी शहरातील पथविक्रेत्यांनी http://pmsvanidhi.mouha.gov.in या लिंकद्वारे स्वतः किंवा सेतू केंद्रामार्फत ऑनलाइन अर्ज भरणे आवश्‍यक आहे. योजनेचा मुंबईस्थित नगर परिषद प्रशासन संचालनालयाच्या माध्यमातून महापालिका क्षेत्रात लाभ देण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. 
आत्मनिर्भर भारत या संकल्पनेंतर्गत शहरातील पथविक्रेत्यांना कर्ज स्वरूपात अधिक सहाय्य देऊन अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी ही योजना आहे. पथविक्रेते नागरी अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक आहेत. कोविड-१९ मुळे लॉकडाउन लागू झाल्यावर पथविक्रेत्यांच्या उपजीविकेवर विपरीत परिणाम झाला. त्यामुळे त्यांना व्यवसायास खेळत्या भांडवलाद्वारे पतपुरवठ्याचा निर्णय केंद्राने घेतला. निधीद्वारे पथविक्रेत्यांसाठी या योजनेची सुरवात केलेली आहे. या संदर्भात शहर क्षेत्रासाठी स्थापन शहर फेरीवाला समितीची बैठक आयुक्‍त अजीज शेख यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झाली. व्यापारी संघाचे सदस्य, फेरीधारकांचे प्रतिनिधी, अशासकीय संघटना सदस्य, स्वयंसेवी संस्था सदस्य समितीत आहेत. त्यांना योजना, अटी-शर्तींसह आवश्‍यक कागदपत्रांची माहिती देण्यात आली. नितीन बंग, शकील बागवान, अपंग कल्याण समिती अध्यक्षा ललिता पवार, जयश्री शहा, अनिता वाघ आणि अधिकारी उपस्थिती होते. योजनेच्या लाभाबाबत अधिकाधिक पथविक्रेत्यांना लाभाचे आवाहन महापौर चंद्रकांत सोनार, आयुक्‍त शेख, उपमहापौर कल्याणी अंपळकर आदींनी केले. 
 

संपादन : राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule corporation second rank in state pradhanmantri swandhi scheme