esakal | ट्री-गार्ड अखेर परत करण्याची नामुष्की 
sakal

बोलून बातमी शोधा

dhule corporation tree guard

महापालिकेच्या बांधकाम विभागाने ३ सप्टेंबर २०१९ ला ट्री-गार्ड खरेदीसाठी २२ लाख ८६ हजार ९०० रुपयांची निविदा काढली होती. यातून चार हजार ट्री-गार्ड खरेदी निश्‍चित केली होती.

ट्री-गार्ड अखेर परत करण्याची नामुष्की 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धुळे : मागील वर्षी तब्बल २३ लाख रुपयांची निविदा काढून खरेदी केलेले ट्री-गार्ड वर्षभर धूळखात पडल्यानंतर आता ते परत करण्याची नामुष्की महापालिकेवर ओढवली आहे. वारंवार तक्रारी करून माध्यमांनी हा विषय लावून धरल्यानंतरही महापालिका प्रशासनाचे कानावर हात, तोंडावर बोट अशीच भूमिका होती. शेवटी रेट्यामुळे थर्ड पार्टी इन्स्पेक्शन झाले आणि सत्य समोर आले. त्यामुळे वर्षभरानंतर का होईना महापालिकेला हे ट्री-गार्ड परत करण्याशिवाय आता गत्यंतर उरले नाही. 
महापालिकेच्या बांधकाम विभागाने ३ सप्टेंबर २०१९ ला ट्री-गार्ड खरेदीसाठी २२ लाख ८६ हजार ९०० रुपयांची निविदा काढली होती. यातून चार हजार ट्री-गार्ड खरेदी निश्‍चित केली होती. संबंधित कंत्राटदाराने त्यापैकी १६०० ट्री-गार्ड बनवून महापालिकेत आणून टाकले होते. मात्र, पावसाळा, हिवाळा, उन्हाळाही गेला पण हे ट्री-गार्ड जागेवरून हलले नाहीत. धूळखात पडलेल्या या ट्री-गार्डबाबत नगरसेवकांनीही विचारणा केली. ‘सकाळ'नेही हा विषय मांडला होता. मात्र, अधिकारी यावर बोलण्यास तयार नव्हते. 

ट्री-गार्डच्या वजनात हेराफेरी 
ठेकेदाराने ट्री-गार्ड ‘मनपा’त आणून टाकले खरे; पण ते कोणाच्या ताब्यात दिले यावरून संभ्रम होता. भांडार विभागाने ट्री-गार्ड ताब्यात घेण्यापूर्वी निविदेतील अटी-शर्तीप्रमाणे ट्री-गार्डचे वजन आहे अथवा नाही याची शहानिशा करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे ट्री-गार्डचे बिंग फुटले. दरम्यानच्या काळात शिवसेनेनेदेखील ट्री-गार्डच्या वजनात तफावत असल्याचा मुद्दा समोर आणला होता. निविदेत नऊ किलोचे ट्री-गार्ड प्रत्यक्षात तीन-साडेतीन किलोचाच असल्याची तक्रार होती. त्यामुळे अखेर आयुक्त अजीज शेख यांनी थर्ड पार्टी इन्स्पेक्शनचा आदेश दिला होता. आता थर्ड पार्टी इन्स्पेक्शनमध्ये ट्री-गार्डचे वजन कमी असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आयुक्त शेख यांनी संबंधित फाईलवर रिजेक्ट असा शेरा मारल्याने ट्री-गार्ड परत करणे आता भाग आहे. ही फाईल सध्या बांधकाम विभागाकडे असल्याचे समजते. 

तक्रारी, रेटा नसता तर..? 
ट्री-गार्डबाबत तक्रारी नसत्या, माध्यमांनी हा विषय मांडला नसता, तर तब्बल २३ लाखांचे अटी-शर्तीप्रमाणे नसलेले ट्री-गार्ड खरेदी झाले असते. त्यात कुणाला हात मारायचा त्यांनी मारले असते. महापालिकेतील हा प्रकार केवळ एक नमुना आहे, अशा अनेक भानगडींचा उलगडा कधी होतच नाही, हेही तेवढेच खरे. 

loading image