धक्कादायक ः कोरोनाप्रश्‍नी धुळ्यात "कागदा'वर दक्षता 

निखिल सूर्यवंशी 
मंगळवार, 31 मार्च 2020

थंड कारभार आणि दुर्लक्षामुळे "सिव्हिल'ला आलबेल वातावरण आहे. "कोरोना'मुळे "सिव्हिल'चे डॉक्‍टर व कर्मचाऱ्यांना जिल्हा सर्वोपचार रुग्णालयाकडे वर्ग करण्यात यावे.

धुळे ः देशासह राज्यात आणीबाणीची स्थिती असताना, जळगाव, नाशिकला संसर्गजन्य कोरोना बाधित रुग्ण आढळल्यावरच धुळे जिल्ह्याची सुस्त सरकारी यंत्रणा आज खाड्‌कन जागी झाली. मग, वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपल्याकडे नेमकी स्थिती काय, तयारी काय, उपाययोजना कशा झाल्या आहेत याचा आढावा घेण्याची उपरती सुचली. त्यात दक्षता, तयारी फक्त "कागदा'वर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. 

फक्त चकाचक कक्ष पाहून खूष 
या स्थितीमुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. त्यांनी दुपारनंतर नियोजनासह शाब्दिक तयारीला सुरवात केली. यादरम्यान, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनीही रुग्णालयातील केवळ चकाचक "कोरोना' कक्ष पाहून तयारी छान असल्याचा आव आणला. त्यांनी स्थितीवर लक्ष असल्याचा देखावा निर्माण केला. हे वास्तव अक्षरशः धुळेकरांच्या जिवाशी खेळच असल्याचे म्हणावे लागेल. 

"पीपीई', मास्कची आता मागणी 
जळगाव, नाशिकपर्यंत "कोरोना'ने पाय पसरल्यानंतर त्याने चुकून धुळ्यात शिरकाव केला तर सर्वप्रथम हिरे वैद्यकीय महाविद्यालयासह जिल्हा सर्वोपचार रुग्णालय, जिल्हा शासकीय रुग्णालय (सिव्हिल), महापालिका दवाखाने आणि जवाहर मेडिकल फाउंडेशनच्या वैद्यकीय पथकाकडे "पीपीई' अर्थात "पर्सनल प्रोटेक्‍टीव्ह इक्विपमेंट' लागतील. यात विशिष्ट प्रकारचे कपडे, मास्क आदींचा समावेश असतो. तसेच ई- 95 फेस मास्कची, हातांच्या नियमित स्वच्छतेसाठी सॅनिटायझरची गरज भासेल. 

चुकून कोरोनाग्रस्त आढळला तर...? 
या गोष्टी खर तर पूर्वीच उपलब्ध होण्याची गरज होती. त्यासाठी आरोग्य, सरकारी यंत्रणेने आणि लोकप्रतिनिधींनी सरकारकडे पाठपुरावा करून या बाबी आतापर्यंत मिळवून घेण्याची गरज होती. मात्र, "पीपीई', मास्क, सॅनिटायझरची राज्य सरकारकडे आता मागणी नोंदविली गेली आहे. चुकून एखादा कोरोनाग्रस्त रुग्ण येथे आढळला तर आरोग्य यंत्रणा पुरती "फेल' गेलेली दिसेल, अशी भयावह स्थिती आज जिल्हाधिकारी गंगाथरन देवराजन यांच्या पाहणीप्रसंगी समोर आली. 

"व्हेटिंलेटर'चीही तीच गत 
"कोरोना'मुळे काय घडू शकेल याची कुणाला कसलीही शाश्‍वती नाही. त्यावर प्रभावीपणे आणि प्रामाणिकतेने उपाययोजना करणे, तयारीत राहाणे गरजेचे होते. "पीपीई', सॅनिटायझर, "ई- 95 मास्क'सह कोरोनाग्रस्तांना व्हेंटिलेटरची गरज भासते. जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात 13 व्हेंटिलेटर आहेत. पैकी चार इतर आजाराच्या रुग्णांसाठी वापरात आहेत. त्यामुळे उर्वरित नऊ व्हेंटिलेटर सज्ज ठेवल्याचा रुग्णालयाचा दावा आहे. मात्र, त्यांची अधिक आवश्‍यकता भासली किंवा तांत्रिक अडचणी उद्‌भवल्या तर राखीव म्हणून खासगी रुग्णालयातील काही व्हेंटिलेटर उपलब्धतेची तजवीज करून ठेवणे गरजेचे होते. तसे काही झालेले नाही. सर्वोपचार रुग्णालयाला आणखी तीन व्हेंटिलेटर मिळावे, अशी मागणी सरकारकडे नोंदविण्यात आली आहे. थंड कारभार आणि दुर्लक्षामुळे "सिव्हिल'ला आलबेल वातावरण आहे. "कोरोना'मुळे "सिव्हिल'चे डॉक्‍टर व कर्मचाऱ्यांना जिल्हा सर्वोपचार रुग्णालयाकडे वर्ग करण्यात यावे. सर्वोपचार रुग्णालयाला शंभर वैद्यकीय अधिकारी व सर्व श्रेणीतील कर्मचाऱ्यांची गरज आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule Corrosion questions only "paperwork" in the dust