शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्याचे वितरण करा : पालकमंत्री सत्तार

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 19 April 2020

"कोरोना'चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी 3 मेपर्यंत "लॉकडाउन' आहे. अशा परिस्थितीत शिधापत्रिकाधारकांसाठी शासनातर्फे अन्नधान्य पुरवठा होत आहे. केशरी किंवा पिवळ्या शिधापत्रिकाधारकांना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून अन्नधान्य पुरवठा करावा.

धुळे : जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना शासनाच्या निर्देशानुसार "सोशल डिस्टन्सिंग'चे पालन करीत स्वस्त धान्य दुकानातून अन्नधान्याचा पुरवठा करावा, असे निर्देश पालकमंत्री तथा महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास, विशेष साहाय्य विभागाचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहेत. 
पालकमंत्री सत्तार यांनी जिल्हाधिकारी संजय यादव यांना पत्राद्वारे सूचना केल्या आहेत. त्यात "कोरोना'चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी 3 मेपर्यंत "लॉकडाउन' आहे. अशा परिस्थितीत शिधापत्रिकाधारकांसाठी शासनातर्फे अन्नधान्य पुरवठा होत आहे. केशरी किंवा पिवळ्या शिधापत्रिकाधारकांना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून अन्नधान्य पुरवठा करावा. "लॉकडाउन' काळात नागरिकांना अन्नधान्याचा पुरेसा पुरवठा व्हावा, यासाठी सुमारे सात कोटी नागरिकांना तीन महिन्यांसाठी दोन रुपये प्रतिकिलो दराने गहू व तीन रुपये प्रतिकिलो दराने तांदूळ स्वस्त धान्य दुकानांतून उपलब्ध करून दिला आहे. तसेच केंद्र सरकारने जाहीर केलेले मोफत पाच किलो तांदळाचेही वितरण सुरू आहे. राज्यातील ज्या कुटुंबांना वरील दोन योजनांचा लाभ मिळत नाही, अशा केशरीकार्डधारकांनाही आठ रुपये प्रतिकिलो दराने गहू व 12 रुपये प्रतिकिलो दराने तांदूळ वितरणाचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी सामाजिक जाणिवेतून अन्नधान्याचे वितरण सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत व्यवस्थित होईल, याची दक्षता घ्यावी. जे स्वस्त धान्य दुकानदार नागरिकांची फसवणूक करतील किंवा अन्नधान्याची साठवणूक करून त्याचा दुरुपयोग करतील, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, असेही निर्देश पालकमंत्री सत्तार यांनी दिले आहेत. 

तक्रारीसाठी टोल फ्री हेल्पलाइन 
स्वस्त धान्य दुकानदारामार्फत वितरित होणाऱ्या अन्नधान्याचे वाटप सुरळीत व विनातक्रार व्हावे, तसेच गरजू व सर्वसामान्यांना व्यवस्थित लाभ मिळण्यासाठी तत्काळ उपाययोजना करावी, अशीही सूचना पालकमंत्री सत्तार यांनी जिल्हाधिकारी यादव यांना केली आहे. स्वस्त धान्य दुकानदारांविषयी काही समस्या असतील, तर राज्यस्तरावर अन्न व नागरी पुरवठा विभागाने 1800224950/1967 ही टोल फ्री हेल्पलाइन सुरू केली आहे. तक्रार असल्यास नागरिकांनी या हेल्पलाइनवर संपर्क साधावा, असेही आवाहन पालकमंत्री सत्तार यांनी केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule Credit card holder Distribution of cereals Guardian Minister sattar