धुळ्यात आढळले मृत कावळे; बर्ड फ्लू्च्या पार्श्वभूमीवर शंका-कुशंकांना उधाण 

रमाकांत घोडराज
Friday, 12 February 2021

धुळे जिल्हा न्यायालयाच्या आवारात झाडांखाली ५० मीटरच्या परिघात एकूण १६ कावळे मृतावस्थेत आढळून आल्याने भित्तीचे वातावरण निर्माण झाले.

धुळे ः जिल्हा न्यायालयाच्या आवारात आज (ता.१२) अचानक १६ कावळे मृतावस्थेत आढळून आले. बर्ड फ्लूचा जिल्ह्यात शिरकाव झाल्याने या कावळ्यांच्या मृत्यूंमुळे तर्कवितर्क लढविले जात आहेत. दरम्यान महापालिकेच्या पथकाने मृत कावळ्यांना डंपिंग बॅगमध्ये बंदिस्त करून ते पशुवैद्यकीय विभागाच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले. कावळ्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे नमुने तपासणीनंतरच कळणार आहे. 

आवर्जून वाचा- राजकारणात जन्माला घातलेल्यांनीच माझा छळ केला। खडसेंचे महाजनांवर पून्हा टिकास्त्र 

 

कोरोना संकटाचा प्रभाग कमी होत असताना बर्ड फ्लूचे संकट उभे राहिले आहे. धुळे तालुक्यातील मेहेरगाव येथे बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याचे समोर आल्यानंतर तेथील पोल्ट्री फार्ममधील कोंबड्या नष्ट करण्यासह आवश्‍यक उपाययोजनांमध्ये यंत्रणा जुंपली आहे. दरम्यान, आज  धुळे जिल्हा न्यायालयाच्या आवारात झाडांखाली ५० मीटरच्या परिघात एकूण १६ कावळे मृतावस्थेत आढळून आल्याने भित्तीचे वातावरण निर्माण झाले. अॅड. कुंदन पवार यांच्या हे लक्षात आल्यानंतर त्यांनी संबंधितांशी संपर्क साधत याबाबत माहिती दिली.

मृत कावळ्यांचे नमुने तपासणीसाठी

काही वेळातच महापालिकेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी शुभम केदार तेथे आले. त्यांनी एका डंपिंग बॅगमध्ये हे कावळे जमा करून ते पारोळा रोडवरील पशुवैद्यकीय दवाखान्यात जमा केले. नंतर महापालिकेचे सहाय्यक आरोग्याधिकारी लक्ष्मण पाटील यांनी पशुवैद्यकीय दवाखान्यात जाऊन अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. मृत कावळ्यांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठविणार असल्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले. दरम्यान, महापालिकेच्या पथकाने नंतर जिल्हा न्यायालयाचे आवारात ज्या ठिकाणी कावळे मृतावस्थेत आढळून आले होते तो परिसर सॅनिटाईझ केला. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule dead crows found city bird flu