esakal | कर्जमाफी, पीककर्जवाटपप्रश्‍नी कृषिमंत्री नाराज...विशेष मोहीम राबविण्याच्या दिल्या सूचना ! 
sakal

बोलून बातमी शोधा

कर्जमाफी, पीककर्जवाटपप्रश्‍नी कृषिमंत्री नाराज...विशेष मोहीम राबविण्याच्या दिल्या सूचना ! 

जिल्हा सहकारी बँकेने ५० कोटींपैकी आतापर्यंत ११ हजार शेतकऱ्यांना सुमारे २२ कोटींचा निधीवाटप केला. उर्वरित राष्ट्रीयीकृत व इतर बँकांनी सुमारे २५७ कोटींचा निधी गतीने पात्र शेतकऱ्यांना वाटप करणे गरजेचे आहे.

कर्जमाफी, पीककर्जवाटपप्रश्‍नी कृषिमंत्री नाराज...विशेष मोहीम राबविण्याच्या दिल्या सूचना ! 

sakal_logo
By
निखील सुर्यवंशी

धुळे ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्याला ३०७ कोटींचा निधी शासनाने दिला. मात्र, जिल्हा सहकारी बँक वगळता राष्ट्रीयीकृत आणि इतर बँकांचे कर्जमुक्ती योजनेतील निधीवाटपाचे काम समाधानकारक नाही. तसेच जिल्ह्यात पीककर्जवाटपाच्या एकूण उद्दिष्टापैकी केवळ २६ टक्के निधीवाटप झाला. हेही काम समाधानकारक नाही, अशा शब्दांत कृषिमंत्री दादा भुसे यांनी मंगळवारी (ता. २८) नाराजी व्यक्त केली. त्यांनी विशेष मोहिमेद्वारे कर्जमाफी आणि पीककर्जवाटपाचे उद्दिष्ट गतीने पूर्ण करण्याची सूचना यंत्रणेला दिली. 

कृषिमंत्री भुसे जिल्हा दौऱ्यावर होते. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. दुपारी साडेतीननंतर पत्रकार परिषदेत त्यांनी बैठकीतील माहिती दिली. जिल्हाधिकारी संजय यादव, आमदार मंजुळा गावित, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती रामकृष्ण खलाणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मनोजकुमार दास, धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धीरज चौधरी, जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी पी. एम. सोनवणे आदींसह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

कृषिमंत्र्यांची नाराजी 
मंत्री भुसे म्हणाले, की शेती कर्जमाफी योजना २०१९ अंतर्गत जिल्ह्यातील सरासरी ४० ते ४५ हजार शेतकऱ्यांना ३०७ कोटी रुपयांचा लाभ दिला गेला. यात तुलनेत जिल्हा सहकारी बँकेने ५० कोटींपैकी आतापर्यंत ११ हजार शेतकऱ्यांना सुमारे २२ कोटींचा निधीवाटप केला. उर्वरित राष्ट्रीयीकृत व इतर बँकांनी सुमारे २५७ कोटींचा निधी गतीने पात्र शेतकऱ्यांना वाटप करणे गरजेचे आहे. तसेच जिल्ह्यात पीक कर्जांतर्गत यंदा सुमारे अकराशे कोटींच्या निधीवाटपाचे उद्दिष्ट आहे. पैकी तुलनेत सुमारे तीनशे कोटींच्या निधीवाटपाचे म्हणजेच सरासरी २६ टक्के पीककर्जवाटपाचे उद्दिष्ट गाठले आहे. यातही जिल्हा बँकेने १६० कोटींपैकी १७ हजार शेतकऱ्यांना ९९ कोटी म्हणजेच सरासरी ६१ टक्क्यांचे उद्दिष्ट गाठले आहे. एकंदर कर्जमाफी योजनेच्या तुलनेत पीककर्जाचे वितरण कमी आहे. त्यामुळे अग्रणी बँक, जिल्हा उपनिबंधकांनी पीककर्ज वितरणासाठी विशेष मोहीम राबवावी, जेणेकरून शेतकरी उत्पादन वाढवतील आणि त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल. जिल्हाधिकारी यादव यांनी कर्ज वितरणाचा दर तीन दिवसांनी आढावा घ्यावा, अशी सूचना मंत्री भुसे यांनी दिली. 

खताचा साठा देऊ 
जिल्ह्यात सरासरी ९५ टक्के पेरणी पूर्ण झाली असून, रासायनिक खतांचा पुरेसा साठा येत्या आठ दिवसांत उपलब्ध करून देऊ, असे मंत्री भुसे यांनी सांगितले. बैठकीपूर्वी मंत्री भुसे यांनी विटाई, बेहेड (ता. साक्री) येथील शेतकरी, लोणखेडी (ता. धुळे) येथे शेती शाळेत महिलांशी संवाद साधला. विटाईत धनराज गजमल खैरनार यांची शेत पाहणी केली. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत मका पीक प्रात्यक्षिक, डाळिंबबागेची पाहणी केली. बेहेड शिवारात गवार आणि तुरीच्या आंतरपिकाची पाहणी केली. नांदवण (ता. साक्री) येथील डाळ मिलला भेट दिली. आमदार गावित, तहसीलदार, कृषी अधिकारी, डॉ. तुळशीराम गावित, पंचायत समिती सदस्य राजधर देसले, विटाईचे सरपंच भीमराव खैरनार, कासारेचे सरपंच विशाल देसले उपस्थित होते.  

संपादन- भूषण श्रीखंडे