खासगी हॉस्पिटल्सवर संक्रांत; पॅरामेडिकल स्टाफवर कारवाईचा निर्णय 

निखील सुर्यवंशी
Tuesday, 11 August 2020

शहरातील खासगी हॉस्पिटल्समधील २५ टक्के बेड आरक्षित करण्याची कार्यवाही महापालिका प्रशासनाने सुरू केली. त्याअनुषंगाने आयुक्त शेख यांनी शनिवारी महापालिका शहरातील संबंधित खासगी हॉस्पिटल्सच्या प्रतिनिधींची बैठक घेतली.

धुळे  : खासगी हॉस्पिटल्समध्ये कोरोनाबाधित रुग्णांसाठी २५ टक्के बेड आरक्षित ठेवण्याच्या अनुषंगाने येथील महापालिका आयुक्त अजिज शेख यांनी शहरातील खासगी हॉस्पिटलच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन त्यांना याबाबत व्यवस्था सुसज्ज ठेवण्याच्या सूचना दिल्या. खासगी हॉस्पिटल्समधील पॅरामेडिकल स्टाफने सहकार्य केले नाही अथवा ते हॉस्पिटल सोडून गेले, तर त्यांचे रजिस्ट्रेशन रद्द करण्यासह गुन्हे दाखल केले जातील, असा सज्जड इशाराही आयुक्तांनी दिला. 

कोरोनाबाधितांची संख्या शहरात दिवसेंदिवस वाढत असल्याने रुग्णांना वैद्यकीयसेवा उपलब्ध व्हावी, यासाठी शहरातील खासगी हॉस्पिटल्समधील २५ टक्के बेड आरक्षित करण्याची कार्यवाही महापालिका प्रशासनाने सुरू केली. त्याअनुषंगाने आयुक्त शेख यांनी शनिवारी महापालिका शहरातील संबंधित खासगी हॉस्पिटल्सच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. अतिरिक्त आयुक्त गणेश गिरी, उपायुक्त शांताराम गोसावी, सहाय्यक आयुक्त तुषार नेरकर, विनायक कोते, आरोग्याधिकारी डॉ. महेश मोरे, डॉ. प्रशांत पाटील, गणेश मल्टी हॉस्पिटल, चिरंतन हॉस्पिटल, देवरे एक्सिडेंट हॉस्पिटल, इन्स्टिट्यूट ऑफ युरोलॉजी, आई एकविरा मेडिकल इन्स्टिट्यूट, सेवा सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल, तेजनक्ष हेल्थकेअर, निरामय हॉस्पिटल, वरदान हॉस्पिटल, केशरानंद हॉस्पिटल आदी हॉस्पिटल्सचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

महत्त्वाच्या सूचना 
ज्या हॉस्पिटलमध्ये ५० बेडपेक्षा जास्त क्षमता आहे, अशा ठिकाणी २५ टक्के बेड आरक्षित ठेवणे, हॉस्पिटलमधील प्रवेश व बाहेर निघण्याचा मार्ग स्वतंत्र असणे, मेडिकल स्टाफसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करणे, शासनाने निश्चित केलेल्या दराची माहिती, उपलब्ध बेडची माहिती दैनंदिन दर्शनी भागावर प्रदर्शित करणे, रुग्णाला शासनाच्या वैद्यकीय योजना व विमा पॉलिसी कॅशलेस सुविधांबाबत माहिती देणे, दरपत्रक प्रसिद्ध करणे व तातडीने रुग्णांसाठी हॉस्पिटल सुसज्ज करण्याबाबत आयुक्त शेख यांनी निर्देश दिले. संबंधित हॉस्पिटलच्या प्रमुखांकडून उपलब्ध बेडची माहिती घेऊन त्यांच्या अडीअडचणीही जाणून घेतल्या. उपस्थित हॉस्पिटलच्या प्रमुखांनी रुग्णांना आवश्यक त्या वैद्यकीय सोयीसुविधा दिल्या जातील, असा सकारात्मक प्रतिसाद दिला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule decision to take action on paramedical staff