कोरोनाच्या गर्दीत डेंग्‍यूचा डास हरवला; रूग्‍ण नाही की तक्रार नाही

रमाकांत घोडराज
Friday, 27 November 2020

कोरोना विषाणूच्या संकटाबरोबरच दरववर्षीप्रमाणे डेंग्यू, मलेरियाच्या तक्रारी वाढण्याची भिती आहे. त्यातही शहरात दरवर्षी या दिवसांमध्ये डेंग्यूच्या तक्रारी वाढतात. खासगी दवाखान्यातही गर्दी असते. सुदैवाने यावर्षी कोरोनाचे संकट असतांना या समस्येने आत्तापर्यंत तरी डोके वर काढल्याचे दिसत नाही.

धुळे : दरवर्षी साधारण सप्टेबर ते डिसेंबरदरम्यान डेंग्यूच्या तक्रारींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. यावर्षी मात्र तसे चित्र नाही. नगरसेवक, नागरिकांकडून डेंग्यू, मलेरियाच्या धोक्याबाबत तक्रारी होत आहेत. मात्र, सरकारी आकडेवारीनुसार शहरात आज अखेरपर्यंत केवळ ३२ डेंग्यू संशयित असून यातील एकही डेंग्यू पॉझिटिव्ह रुग्ण नाही. 

कोरोना विषाणूच्या संकटाबरोबरच दरववर्षीप्रमाणे डेंग्यू, मलेरियाच्या तक्रारी वाढण्याची भिती आहे. त्यातही शहरात दरवर्षी या दिवसांमध्ये डेंग्यूच्या तक्रारी वाढतात. खासगी दवाखान्यातही गर्दी असते. सुदैवाने यावर्षी कोरोनाचे संकट असतांना या समस्येने आत्तापर्यंत तरी डोके वर काढल्याचे दिसत नाही. शहरातील अनेक भागांमध्ये अस्वस्छता, गटारांची साफसफाई होत नसल्याने काही नागरिक, नगरसेवकांकडून तक्रारी होत आहेत. डेंग्यू, मलेरियाचा धोका वाढण्याची शक्यता घेता उपाययोजना करण्याची मोहिम राबविण्याची मागणीही होत आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी या बाबी आवश्‍यकदेखील आहेत. स्थायी समिती सभापती सुनील बैसाणे यांनीदेखील काही दिवसांपूर्वी हा धोका लक्षात घेऊन उपाययोजना करण्याचे व दैनंदिन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. 

डेंग्यूचा एकही पॉझिटिव्ह नाही 
जानेवारी ते आजअखेरपर्यंत शहरात डेंग्यूचे एकुण ३२ संशयित रुग्ण आढळुन आल्याचे व यातील बहुतांश संशयित रुग्ण हे सप्टेंबर, ऑक्टोबर व नोव्हेंबरमधील असल्याचे सहाय्यक सार्वजनिक आरोग्याधिकारी तथा मलेरिया विभागप्रमुख लक्ष्मण पाटील यांनी सांगितले. या ३२ संशयित रुग्णांपैकी आत्तापर्यंत एकही डेंग्यू पॉझिटिव्ह नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

उपाययोजना आवश्‍यकच 
शासकीय पातळीवर डेंग्यूचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण समोर आलेला नसला तरी थाड्याफार तक्रारी होतांना दिसतात. शिवाय गेल्या काही वर्षापेक्षा यावर्षी डेंग्यूने डोके वर काढलेले नाही. कोरोना संकटात ही समाधानाची बाब आहे. ही स्थिती अशीच नियंत्रणात ठेवण्यासाठी मात्र, महापालिकेने संपूर्ण शहरात आवश्‍यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्‍यक आहे. तशी मागणीही अनेक नगरसेवकांकडून होत आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule dengue no patient in coronavirus peried