esakal | धुळ्यात  वन विभागाजवळ ठेलारींचे बिऱ्हाड आंदोलन सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

धुळ्यात  वन विभागाजवळ ठेलारींचे बिऱ्हाड आंदोलन सुरू

मेंढपाळ- ठेलारी समाजाला शेळ्यामेंढ्या चारण्यासाठी २००५ ला शासनाकडून काही हेक्टर वनजमीन चराईक्षेत्र म्हणून आरक्षित झाले. तेव्हापासून समाजाच्या हक्काची आरक्षित जमीन दाखविली नाही.

धुळ्यात  वन विभागाजवळ ठेलारींचे बिऱ्हाड आंदोलन सुरू

sakal_logo
By
निखील सुर्यवंशी

धुळे ः चराई क्षेत्रातील जमिनीच्या वादातून राज्य ठेलारी महासंघाच्या येथील शाखेतर्फे शहरातील वनविभागाच्या कार्यालयाजवळ सोमवार पासून बिऱ्हाड आंदोलन सुरू झाले. वादावर तोडगा काढला जात नसल्याने अतिक्रमणधारक आणि मेंढपाळ- ठेलारी समाजात भांडणे होत असल्याची कैफियत आंदोलकांनी मांडली. 

विविध मागण्यांप्रश्नी ठेलारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी राजमाता श्री अहिल्यादेवी पुतळ्यापासून मोर्चा काढला. त्यात बहुसंख्य समाजबांधव शेळ्या- मेंढ्यांसह सहभागी झाले. आंदोलकांनी उपवनसंरक्षकांना निवेदन दिले. त्याची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. 


आंदोलकांच्या मागण्या 
मेंढपाळ- ठेलारी समाजाला शेळ्यामेंढ्या चारण्यासाठी २००५ ला शासनाकडून काही हेक्टर वनजमीन चराईक्षेत्र म्हणून आरक्षित झाले. तेव्हापासून समाजाच्या हक्काची आरक्षित जमीन दाखविली नाही. परिणामी, वनक्षेत्रात अतिक्रमणधारक आणि मेंढपाळ- ठेलारी समाजात भांडणे होत आहेत. जोपर्यंत चराई क्षेत्रातील जमीन दाखविली जात नाही, तोपर्यंत येथील उपवनसंरक्षकांच्या कार्यालयापुढे बिऱ्हाड आंदोलन सुरूच राहील, असा इशारा ठेलारी महासंघाने दिला. ग्रेझिंग सेटलमेंटद्वारे २००५ मध्ये मेंढपाळ वास्तव्यास असलेल्या धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, नाशिक जिल्ह्यात चराईसाठी जमीन आरक्षित आहे. ठेलारी महासंघ व मेंढपाळ ठेलारी समाजाने वेळोवेळी मागणी करूनही वनविभागाने आमचे उपजीविकेचे साधन असलेली मागणी जमीन दाखविली नाही. दोन ते तीन वर्षांपासून ही मागणी आहे. चराई क्षेत्र दाखविण्याच्या मागणीबाबत सात क्षेत्रीय अधिकाऱ्यांशी संपर्काचा प्रयत्न केला.

साक्री व धुळे तालुक्यातील अधिकारी- कर्मचाऱ्यांनी गुंडगिरीची भाषा वापरली. या निषेधार्थ आंदोलन सुरू केल्याचेही सांगण्यात आले. त्यात राज्य ठेलारी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शिवदास वाघमोडे, प्रदेश उपाध्यक्ष रामदास कारंडे, कोशाध्यक्ष दिनेश सरग यांच्या नेतृत्वात गोविंद रुपनर, नाना पडळकर, ज्ञानेश्वर सुळे, संतोष सुळे, मोहन भिवरकर, पिंटू भिवरकर, मोतीराम गरदरे, विलास गरदरे, धनराज केसकर, बापू भिवरकर, सोनू टिले, वासुदेव केसकर, मिठाराम येळे, काशिनाथ लकडे, शिवाजी टिळेकर, नाना सोन्नर, नाना मानकर, विठ्ठल गोयकर आदी सहभागी झाले. आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष भय्या पारेराव, शंकर खरात, नामदेव येळवे, योगेश जगताप यांनी पाठिंबा दिला.  

संपादन- भूषण श्रीखंडे