दोघांचा मृत्यू, तीन जण पॉझिटिव्ह; धुळे बाजार समितीही "लॉकडाउन' 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 9 July 2020

बाजार समितीतील भाजीपाला व्यापाऱ्याच्या कुटुंबातील आई-वडील, मुलगा कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्यांच्यावर नाशिक येथे उपचार सुरू आहेत. यामुळे खबरदारीसाठी सभापती सुभाष देवरे यांनी बाजार समितीचे कामकाज, व्यवहार आठवडाभर बंद केले आहेत.

धुळे ः येथील बाजार समितीत हमालासह लिपिकाचा मृत्यू, तसेच भाजीपाला व्यापाऱ्याच्या कुटुंबातील तिघे कोरोना पॉझिटिव्ह आल्याने व्यवस्थापनाने बुधवार (ता. 8)पासून आठवडाभर व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सुमारे दीड कोटीच्या व्यवहारावर पाणी सोडावे लागणार आहे. 

तालुका बाजार समितीत चार दिवसांपूर्वी हमालाचा मृत्यू झाला. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद झाली, तसेच लिपिकाचा बुधवारी मृत्यू झाला. त्याला टायफॉइड होता. तसेच हृदयविकाराने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. या दोघांच्या मृत्यूपश्‍चात स्वॅब तपासणीला पाठविले आहेत. 

असे असताना बाजार समितीतील भाजीपाला व्यापाऱ्याच्या कुटुंबातील आई-वडील, मुलगा कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्यांच्यावर नाशिक येथे उपचार सुरू आहेत. यामुळे खबरदारीसाठी सभापती सुभाष देवरे यांनी बाजार समितीचे कामकाज, व्यवहार आठवडाभर बंद केले आहेत. 

बंदचा फटका भाजीपाला उत्पादक, शेतकऱ्यांना बसणार आहे. मात्र, कोरोनाचा फैलाव होऊ नये, म्हणून हा निर्णय समिती व्यवस्थापनाला घ्यावा लागला. समितीच्या आवारात स्वच्छतेसह सॅनिटायझरची फवारणी केली जाईल. समितीचे कामकाज 14 जुलैपासून पूर्ववत सुरू करण्याचा प्रयत्न असेल. आठवडाभरात बाजार समितीत कुणीही शेतमाल विक्रीस आणू नये, असे आवाहन श्री. देवरे यांनी केले. मंगळवारी जनावरांचा बाजार सुरू राहील, असेही त्यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule Dhule market committee also 'lockdown' Two died, three positive