esakal | अनलॉकनंतर धुळे ‘मनपा’ची गती मंद; बांधकामाचे ८०० प्रस्ताव पेंडिंग 
sakal

बोलून बातमी शोधा

अनलॉकनंतर धुळे ‘मनपा’ची गती मंद; बांधकामाचे ८०० प्रस्ताव पेंडिंग 

बांधकाम परवानगीसाठी राज्य शासनाने ‘महावास्तू’ ही ऑनलाइन साइट उपलब्ध केल्याने परवानगीसाठी नागरिकांच्या तुलनेने महापालिकेत चकरा कमी झाल्या.

अनलॉकनंतर धुळे ‘मनपा’ची गती मंद; बांधकामाचे ८०० प्रस्ताव पेंडिंग 

sakal_logo
By
रमाकांत घोडराज

धुळे ः ‘कोरोना’च्या संकटात बहुतांश बांधकामेच बंद झाल्याने या क्षेत्राला याचा मोठा फटका बसला. दरम्यान, आता अनलॉकनंतर बांधकामे सुरू झाली असली, तरी पाहिजे तशी गती मिळालेली नाही. बांधकाम परवानगीच्या अनुषंगाने फारसा फरक नसल्याचे अधिकारी म्हणतात. महापालिका क्षेत्रातील बांधकाम परवानगीची स्थिती लक्षात घेतल्यास ऑनलाइन बांधकाम परवानगी सुरू झाल्यानंतर आतापर्यंत सुमारे साडेतीन हजार प्रस्ताव सादर झाले. यातील साधारण अडीच हजारांवर प्रस्ताव मंजूर झाले. उर्वरित सरासरी ८०० ते ९०० प्रस्ताव विविध कारणांनी पेंडिंग असल्याचे अधिकारी सांगतात. 

‘कोरोना’मुळे बांधकाम क्षेत्राला मोठी झळ सोसावी लागली आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्या मजुरांनाही या काळात आर्थिक विवंचनेला सामोरे जावे लागले. बांधकामेच बंद असल्याने परवानगीसाठीही कुणी धावपळ केली नाही. दरम्यान, आता अनलॉकचा निर्णय झाल्यानंतर या प्रक्रियेस गती येईल, अशी अपेक्षा आहे. बांधकाम परवानगीसाठी राज्य शासनाने ‘महावास्तू’ ही ऑनलाइन साइट उपलब्ध केल्याने परवानगीसाठी नागरिकांच्या तुलनेने महापालिकेत चकरा कमी झाल्या तरी अधिकाऱ्यांनी त्रुटी काढल्यानंतर त्यांच्या पूर्ततेसाठी अनेकांना चकरा मारणे भाग पडते. 

नऊशे प्रस्ताव पेंडिंग 
शासनाने ऑनलाइन परवानगी सुरू केल्यापासून आतापर्यंत साधारण साडेतीन हजार प्रस्ताव सादर झाले. यातील २६०० प्रस्ताव मंजूर झाल्याचे महापालिकेच्या नगररचना विभागातील अधिकाऱ्याने सांगितले. उर्वरित साधारण ९०० प्रस्ताव विविध कारणांनी पेंडींग आहेत. यात जागा पाहणीची प्रक्रिया, नियमानुसार प्लॅन नसणे, आवश्‍यक कागदपत्रांची पूर्तता न होणे यासह विविध कारणांचा यात समावेश आहे. 

आकडेवारीत तफावत 
शासनाच्या ‘महावास्तू‘ या वेबसाइटवर धुळे महापालिकेतील बांधकाम परवानगीची स्थिती व अधिकाऱ्याने सांगितलेली तोंडी आकडेवारी यात मात्र फरक दिसतो. महावास्तूवर एकूण ३ हजार ३६२ प्रस्ताव सादर आहेत. त्यातील २ हजार ५२६ प्रस्तावांवर कार्यवाही झाल्याचे दिसते. काही प्रकरणे अपलोड न झाल्याने या आकडेवारीतील तफावत असल्याचे दिसते. दरम्यान, महावास्तूवर पेंडींग प्रकरणांची आकडेवारी उपलब्ध होत नाही. मात्र सादर प्रस्ताव व कार्यवाही झालेल्या प्रस्तावांची स्थिती लक्षात घेता ८३६ प्रस्ताव पेंडींग असल्याचे दिसते. 


‘महावास्तू’वरील आकडेवारी 
एकूण प्रस्ताव...३३६२ 
प्रस्तावांवर कार्यवाही...२५२६ 
बिल्डिंग परमिशन...२४३३ 
प्लिंथ लेव्हल...९१३ 
पार्ट ऑक्युपेन्सी...०१ 
फुल ऑक्युपेन्सी...१५ 
 

संपादन- भूषण श्रीखंडे