esakal | राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत नवे- जुन्यांमध्ये उफाळला वाद 
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत नवे- जुन्यांमध्ये उफाळला वाद 

नवनवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती, जुन्यांना पदांवरून बाजूला सारण्याचे प्रकार घडत असल्याने वादाला आमंत्रण मिळत असल्याचा वर्तुळात सूर आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत नवे- जुन्यांमध्ये उफाळला वाद 

sakal_logo
By
निखील सुर्यवंशी

धुळे ः राष्ट्रवादी काँग्रेसच्या येथील शहर व जिल्ह्याच्या बैठकीला कार्यकर्त्यांची गर्दी पाहून समाधान वाटले. परंतु, या स्थितीमुळे पक्षाचा आमदार, खासदार निवडला पाहिजे होता. तसे घडत नसल्याने आत्मचिंतनाची ही वेळ आहे, अशी जाणीव पक्षाचे निरिक्षक अर्जुनराव टिळे, अविनाश आदिक यांनी येथे कार्यकर्त्यांना करून दिली. राष्ट्रवादी भवनात रविवारी (ता. ९) झालेल्या बैठकीत गट- तट, नवे- जुन्या कार्यकर्त्यांमधील वाद पाहून ते नाराज झाले. 

राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत असल्याने स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा हुरूप वाढला आहे. यात बैठकीच्या निमित्ताने नवे- जुने कार्यकर्ते, पदाधिकारी, असा वाद निर्माण झाल्याचे चित्र समोर आले. नवनवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती, जुन्यांना पदांवरून बाजूला सारण्याचे प्रकार घडत असल्याने वादाला आमंत्रण मिळत असल्याचा वर्तुळात सूर आहे. पक्षातून भाजपमध्ये गेलेल्यांच्या इशाऱ्यावर चालणाऱ्यांना राष्ट्रवादीत स्थान देऊ नये, अशी मागणीही बैठकीत झाली. 

गट- तट मुंबईला 
पक्षातील विविध गटा- तटाचे पदाधिकारी समर्थकांसह कोरोनाच्या संकटकाळातही मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रीय अध्यक्ष नेते शरद पवार यांच्या भेटीगाठी घेत होते. त्यामुळे प्रदेशाध्यक्षांनी धुळे जिल्ह्यातील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या नेमक्या भावना जाणून घेण्यासाठी निरिक्षक टिळे, आदिक यांना येथे पाठविले होते. ते बैठकीत कार्यकर्त्यांची गर्दी पाहून सुखावले, मात्र गट- तट पाहून नाराज झाले. राष्ट्रवादी भवनात नवे- जुने, गटा- तटाच्या कार्यकर्त्यांमध्ये बरीच खडाजंगी झाली. त्यामुळे निरीक्षकांनी दालनात स्वतंत्रपणे संवाद साधला. 
 
एकनिष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार 
राष्ट्रीय नेते पवार यांनी राष्ट्रवादीची स्थापना केल्यापासून त्यांना साथ देणारे आणि कल्याण भवन परिसरातील ज्या वृक्षाखाली १९९९ ला जिल्हा शाखेची स्थापना झाली त्यावेळेपासून एकनिष्ठ एन. सी. पाटील, जोसेफ मलबारी, सलाम मास्टर, ॲड. रवींद्र पाटील, भोला वाघ, ए. बी. पाटील, शकिल ईसा, नवाब बेग, नंदू येलमामे, ज्ञानेश्वर पाटील आदींचा सत्कार झाला. निरीक्षकांच्या हस्ते शहरात ५० टक्के सवलतीत वह्या वाटपाच्या उपक्रमास सुरवात झाली. जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, विनायक शिंदे, संदीप बेडसे, रवी रणसिंग, पोपटराव सोनवणे, डॉ. जितेंद्र ठाकूर, अनिल मुंदडा, शहराध्यक्ष रणजीत भोसले, सरोज कदम, ज्योती पावरा, प्रा. नरेंद्र तोरवणे, किरण पाटील, संजय बगदे, रईस काझी, कैलास चौधरी, सत्यजीत शिसोदे, महेंद्र शिरसाट, प्रशांत भदाणे, अविनाश लोकरे, भूषण पाटील, मनोज वाल्हे आदी उपस्थित होते. 

संपादन-भूषण श्रीखंडे