मग निवडणूकीत रंग कसा भरणार; सरपंच पदाचे अद्याप आरक्षणच नाही

एल. बी. चौधरी
Wednesday, 16 December 2020

राज्य सरकारच्या आदेशानुसार सरपंच लोकनियुक्तऐवजी निवडलेल्या सदस्यांमधून होणार आहे. राज्यात अनेक जिल्ह्यात सरपंच आरक्षण जाहीर झाले आहे. मात्र, धुळेसह काही जिल्ह्यात ते झाले नाही.

सोनगीर (धुळे) : जिल्ह्यातील २१८ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली असून, प्रभागातील उमेेदवार आरक्षणापूर्वीच तयार झाले आहेत. मात्र, सरपंचपदाचे आरक्षण न निघाल्याने उमेदवार व मतदारांत नाराजी पसरली आहे. निवडणुकीनंतर सरपंचपदाचे आरक्षण काढल्यास सरपंचपदासाठी इच्छुक उमेदवारांच्या मेहनतीवर पाणी फिरणार आहे. 
आधीच सरपंच आरक्षण न काढल्यास निवडणुकीवर बहिष्कारही घातला जाऊ शकतो, अशी स्थिती आहे. तसा इशारा जिल्हा परिषद सदस्या वैशाली चौधरी यांचे पती ज्ञानेश्वर चौधरी व ग्रामस्थांनी दिला आहे. 

इच्छुकांच्या उत्‍साहावर विरजण
राज्यातील १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. राज्य सरकारच्या आदेशानुसार सरपंच लोकनियुक्तऐवजी निवडलेल्या सदस्यांमधून होणार आहे. राज्यात अनेक जिल्ह्यात सरपंच आरक्षण जाहीर झाले आहे. मात्र, धुळेसह काही जिल्ह्यात ते झाले नाही. यापूर्वी बहुतांश निवडणुकीत सरपंच आरक्षण मतदानापूर्वीच काढले जाते. यंदा सरपंचपदाचा निर्णय जाहीर न होताच निवडणूक लागली. सरपंच आरक्षण कधी होईल, हे निश्चित झालेले नाही. त्यामुळे इच्छुकांच्या उत्साहावर विरजण पडले आहे. 

तर बहिष्‍कार टाकणार
जुलै ते डिसेंबरपर्यंत धुळे तालुक्यातील ७२, साक्री तालुक्यातील ४९, शिंदखेडा तालुक्यातील ६३ आणि शिरपूर तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे. त्यापैकी धुळे जिल्ह्यातील २१८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी प्रभागरचना, मतदारयादी, हरकती, सुनावणी आदी कामे झाली आहेत. मात्र, सरपंच आरक्षण अद्याप जाहीर न झाल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. आचारसंहिता लागू झाली आहे. इच्छुकांनी मतदारयाद्या मिळविल्या आहेत. पुणे, बीड आदी जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाले आहे. सरपंच आरक्षण जाहीर झाल्याशिवाय निवडणुकीत रंग भरणार कसा? इच्छुकांची येथेच गोची झाली असून, जिल्ह्यातील निवडणुकांवर परिणाम होऊ शकतो. सरपंच आरक्षण जाहीर न झाल्यास निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, असा इशारा देण्यात आला आहे. 
 
जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून, गावाच्या भविष्यातील विकासाच्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची आहे. नातेवाईक, जात, समाज व धर्म न बघता, तसेच कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता योग्य उमेदवाराच्या पाठिशी उभे राहाणे प्रत्येक मतदाराचे कर्तव्य आहे. 
- मुरलीधर मोरे, सामाजिक कार्यकर्ते, सोनगीर 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule district no reservation anounced sarpanch in gram panchayat election