esakal | धुळे जिल्ह्यात साडेचार लाख क्विंटल कापसाची खरेदी  
sakal

बोलून बातमी शोधा

धुळे जिल्ह्यात साडेचार लाख क्विंटल कापसाची खरेदी  

शासकीय हमीभावाने शेतकऱ्यांकडील एफएक्यू प्रतीचा कापूस सरासरी पाच हजार ११० ते पाच हजार ३५५ रुपये प्रतिक्विंटल या दराने खरेदी केला जात असून, ३० सप्टेंबरपर्यंत केवळ एफएक्यू प्रतीचा कापूस खरेदी होईल.

धुळे जिल्ह्यात साडेचार लाख क्विंटल कापसाची खरेदी  

sakal_logo
By
निखील सुर्यवंशी

धुळे  : जिल्ह्यात आतापर्यंत १४ हजार १४३ शेतकऱ्यांकडून चार लाख ४९ हजार ६०६ क्विंटल कापसाची खरेदी झाल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे यांनी दिली. 

ते म्हणाले, की कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यावर पालकमंत्री तथा महसूल, ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार, जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या मार्गदर्शनाखाली कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणीचे आवाहन झाले. त्यानुसार जिल्ह्यातून एप्रिल व मेमध्ये १२ हजार कापूस उत्पादकांनी नोंदणी केली. खरेदीसाठी भारतीय कापूस निगमकडून (सीसीआय) दहिवद शिवारातील डी. आर. कॉटन जिनिंग प्रेसिंग (ता. शिरपूर), दोंडाईचा येथील केशरानंद जिनिंग प्रेसिंग, अभिषेक जिनिंग प्रेसिंग, वर्धमान जिनिंग प्रेसिंग (ता. शिंदखेडा), राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघातर्फे जवाहर सहकारी सूतगिरणी (मोराणे, ता. धुळे), पाटोदिया जिनिंग प्रेसिंग (मालेगाव, जि. नाशिक) येथे कापूस खरेदी केंद्र सुरू झाले. 

शासकीय हमीभावाने शेतकऱ्यांकडील एफएक्यू प्रतीचा कापूस सरासरी पाच हजार ११० ते पाच हजार ३५५ रुपये प्रतिक्विंटल या दराने खरेदी केला जात असून, ३० सप्टेंबरपर्यंत केवळ एफएक्यू प्रतीचा कापूस खरेदी होईल. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू होण्यापूर्वी आठ हजार ४४५ शेतकऱ्यांचा दोन लाख ६८ हजार ८८६ क्विंटल कापूस खरेदी झाला. कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर खरेदीत अडचण येऊ नये म्हणून मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत खरेदी सुरू ठेवली. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने तालुकानिहाय समन्वयक नियुक्त केले आहेत. आतापर्यंत कापूस पणन महासंघाने ८४१ शेतकऱ्यांच्या २९ हजार ७२ क्विंटल कापसाची खरेदी केली. त्यांच्याकडे दोन हजार ८५६ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. सीसीआयने आतापर्यंत १३ हजार ३०२ शेतकऱ्यांकडील चार लाख २० हजार ५३४ क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. 


जवाहर सूतगिरणीत आतापर्यंत ४६४ शेतकऱ्यांकडून १६ हजार ९७० क्विंटल, पाटोदिया जिनिंग प्रेसिंगने ३७७ शेतकऱ्यांकडील १२ हजार १०१, तर केशरानंद जिनिंग प्रेसिंग, अभिषेक जिनिंग प्रेसिंग, वर्धमान जिनिंग प्रेसिंगने मिळून चार हजार २५२ शेतकऱ्यांकडील एक लाख ३३ हजार २२३ क्विंटल, तर डी. आर. कॉटन जिनिंग प्रेसिंगने ६०५ शेतकऱ्यांकडील १८ हजार ४२५ क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. सर्व कापसाची खरेदी व्हावी, म्हणून पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकारी यादव यांच्या सूचनेनुसार नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडील कापसाचा पंचनामा सहकार व महसूल विभागाने केला होता. त्यानुसार शेतकऱ्यांची संख्या नऊ हजार २७२ होती. उर्वरित शेतकऱ्यांचा कापूस विहित कालावधीत खरेदी केला जाईल, असे जिल्हा उपनिबंधक डॉ. शिंदे यांनी सांगितले.  


 
 

loading image
go to top