esakal | धुळे जिल्ह्यात प्रतिबंधात्‍मक आदेश; या पंधरात असेल अंमलबजावणी
sakal

बोलून बातमी शोधा

dhule district restrictive order

कोणत्याही व्यक्तीची आकृती अथवा प्रतिमेचे प्रदर्शन करणे, सभा घेणे, मिरवणूक काढणे, पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. 

धुळे जिल्ह्यात प्रतिबंधात्‍मक आदेश; या पंधरात असेल अंमलबजावणी

sakal_logo
By
धनराज माळी

धुळे : आगामी काळातील सण- उत्सव तसेच विविध आंदोलनांची शक्यता व कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी संजय यादव यांनी धुळे जिल्ह्यात २८ ते १२ डिसेंबर या कालावधीत प्रतिबंधात्मक आदेश लागू केला आहे. 

अपर पोलीस अधीक्षकांनी सादर केलेला अहवाल लक्षात घेऊन जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी व परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांना मदत व्हावी यासाठी जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी प्राप्त अधिकाराचा वापर करून जिल्ह्यात मनाई आदेश लागू केला आहे. या आदेशानुसार कुणालाही हत्यारे अथवा शारीरिक दुखापती होतील अशा वस्तू वापरता येणार नाहीत. सार्वजनिक शांतता धोक्यात येईल अशी भाषणे, हावभाव अथवा सोंग आणणे, जाहीरपणे घोषणा करणे, गाणे म्हणणे, वाद्य वाजविणे, कोणत्याही व्यक्तीची आकृती अथवा प्रतिमेचे प्रदर्शन करणे, सभा घेणे, मिरवणूक काढणे, पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. 

यास आहे मनाई, घ्‍यावी लागणार परवानगी
मुंबई पोलीस अधिनियमानुसार संबंधित तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांच्या पूर्वपरवानगीशिवाय पाचपेक्षा जास्त व्यक्तींचा समावेश असलेल्या कोणत्याही मंडळीस (जमावास) किंवा मिरवणुकीस मनाई असेल. या कालावधीत सभा, मिरवणुका, मोर्चा, मीटिंग, कार्यक्रम, रॅली आदींबाबत स्थानिक पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांच्या सहमतीने संबंधित तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याबाबत योग्य तो निर्णय घेऊन परवानगी द्यावी. अशी परवानगी तसेच लग्न मिरवणुका, धार्मिक मिरवणुका, आठवडेबाजार अगर प्रेतयात्रेच्या जमावास हे निर्बंध लागू होणार नाहीत, असेही जिल्हादंडाधिकारी श्री. यादव यांनी म्हटले आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे

loading image