धुळे जिल्‍ह्यात वादळी पावसाने झोडपले; पपई, मका, बाजरी जमीनदोस्त

दगाजी देवरे
Saturday, 5 September 2020

सायंकाळी झालेल्या वादळी पावसामुळे खरीप पिकांसह पपई जमीनदोस्त झाली आहे. मका, बाजरी आणि कपाशी जमीनदोस्त झाली आहे. अति पावसामुळे खरीप हातचा जाण्याच्या मार्गावर आहे. नुकसानीचे तातडीने पंचनामे करून भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

धुळे : धुळे शहरासह परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले असून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नवापूर, कापडणे परिसरातही दमदार पाऊस झाला आहे. म्हसदी, वसमार, चिंचखेडे, ककाणी, काळगाव, ककाणीसह देऊर (ता. धुळे) शिवारात शुक्रवारी (ता. ४) सायंकाळी झालेल्या वादळी पावसामुळे खरीप पिकांसह पपई जमीनदोस्त झाली आहे. मका, बाजरी आणि कपाशी जमीनदोस्त झाली आहे. अति पावसामुळे खरीप हातचा जाण्याच्या मार्गावर आहे. नुकसानीचे तातडीने पंचनामे करून भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

म्‍हसदी परिसरात पपईचे नुकसान 
म्‍हसदी येथील युवा शेतकरी चंदन हिम्मतराव देवरे यांनी देऊर (ता. धुळे) अडीच एकर शिवारात तैवान जातीची संकरित पपईची बाग फुलवली आहे. अवघ्या आठवड्याभरात फळ पीक काढले जाणार होते. पण दुर्दैवाने वादळी पावसामुळे अडीच एकर पपईची बाग जमीनदोस्त झाली आहे. दोन दिवसापूर्वी सुमारे वीस हजार रुपये खर्च करून फवारणी केल्याची माहिती शेतकरी चंदन देवरे यांनी दिली. कृषी साहाय्यक किरण देवरे, कोतवाल शीतल देवरे यांनी पंचनामा केला. डाळिंब, शेवगा सारख्या पिकांनी शेतकऱ्यांना आर्थिक उभारी दिली. तसेच इतर पारंपरिक पिका ऐवजी शेतकरी संकरित पपई लागवड करत आहे. यंदा म्हसदीसह देऊर शिवारात काही शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने पपई लागवड केली आहे. महागडी रोपे, निदंणी, रासायनिक खते व कीटकनाशके फवारणीसाठी मोठा आर्थिक खर्च केला आहे. अवघ्या आठ दिवसात काढले जाणारे पीक डोळ्यासमोर फेकण्याची वेळ आली आहे. दोन वर्षांपासून सतत दुष्काळाच्या झळा सोसणारा भाग जलमय झाला आहे. सततच्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या असताना वादळी पावसाने होत्याचे नव्हते केले आहे. कृषी विभागाने पंचनामा करत भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करीत आहे. 

नवापूरला पावसाने झोडपले 
नवापूर शहरासह परिसरात दमदार पावसाने झोडपले असून पिकांचे नुकसान झाले आहे. कापूस, मका, कपाशी, ऊस, सोयाबीन पिकाचे नुकसान होऊन उभी असलेले पिके भुईसपाट झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेली खरीप पिके हातातून जाण्याची चिन्हे दिसू लागल्याने आधीच हतबल झालेला शेतकरी आता मोठ्या संकटात सापडला आहे. पिकांचे तातडीने महसूल यंत्रणेमार्फत पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

कापडणे परिसरात मुसळधार 
कापडणे परिसरात शनिवारी (ता. ५) दुपारी साडेचारच्या सुमाराला वीस मिनिटे वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपले. या पावसामुळे बाजरी, ज्वारी, मका व भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. रात्री साडेबाराला एक तास झालेल्या पावसामुळे नगाव, धुळे व नेर मंडळामध्ये अतिवृष्टी झाली. नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule district today heavy rain and total loss farm