
सर्व व्यवहार पूर्वपदावर आणतानाच राज्य शासनाने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा विचार करून; घालून दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन होणे. खबरदारी घेणे बंधनकारक आहे.
कापडणे (धुळे) : मास्कचा वापर, सातत्याने हात निर्जंतुकीकरण करणे, एका सीटवर एकाच प्रवासाची वाहतूक या अटींवर बस वाहतूक सुरू झाली आहे. प्रत्यक्षात हे सर्व नियम धाब्यावर बसवून बसमधून सर्रास वाहतूक सुरू झाली आहे. वाहकाकडून खबरदारीच्या कोणत्याही सूचना नसल्याने जाणकार आणि दक्षता घेणाऱ्या प्रवाशांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे लग्नसराई सुरू झाल्याने बसमधील गर्दी लक्ष वेधून घेत आहे.
राज्यातील लॉकडाउनमध्ये मोठी शिथिलता आली आहे. काही अपवाद वगळता सर्वच व्यवहार पूर्वपदावर आले आहेत. मात्र, हे सर्व व्यवहार पूर्वपदावर आणतानाच राज्य शासनाने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा विचार करून; घालून दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन होणे. खबरदारी घेणे बंधनकारक आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
शहरात नो मास्क नो एंट्री
धुळे शहरात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांनी नो मास्क नो एंट्री हा स्तुत्य निर्णय घेतला. मात्र, ग्राहकांची वाढती गर्दी आणि व्यापारात झालेल्या वाढीने मास्कचा आग्रह कोणीही धरला नाही. विवाहाचा बस्त्यासाठीही मोठी गर्दी आढळून येत आहे. वास्तविक व्यापारी, मालक व कर्मचाऱ्यांनी मास्कचा आग्रह धरणे अपेक्षित असताना, याकडे सोयीस्कर दुर्लक्ष झाले आहे. यामुळे जाणकारांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
बसमध्ये गर्दीच गर्दी
लग्नसराई सुरू झाली आहे. लॉकडाउनमुळे आठ महिने खोळंबलेले विवाह लावण्यासाठी सारेच सरसावले आहेत. यामुळे प्रवासी वाहतुकीला सुगीचे दिवस आले आहेत. बसमध्ये तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील दक्षतेचा फज्जा उडाला आहे.
खासगी वाहतुकीत भाडेवाढ पण...
खासगी वाहतूक करणाऱ्या वाहन चालक व मालकांनी अपेक्षित प्रवासांपेक्षा निम्यानेच वाहतुकीची अट ठेवून भाडेवाढ केली आहे. मात्र, प्रत्यक्षात अधिक भाडेवाढ घेऊनही अपेक्षितपेक्षा अधिक प्रवासी घेत प्रवास सुसाट सुरू केला आहे. दरम्यान, राज्य परीवहन मंडळाच्या बस आणि खासगी वाहतुकीची तपासणी होण्याची अपेक्षा जाणकारांमधून वर्तविली जात आहे.
संपादन ः राजेश सोनवणे