esakal | सासूकडून सुनेचे, तर पतीकडून पत्नीचे पूजन 
sakal

बोलून बातमी शोधा

diwali lakshmi pujan

लक्ष्मीच्या रूपाने घरातील महिलांचे पूजन केले. गृहलक्ष्मीला आदराचे स्थान देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला. 

सासूकडून सुनेचे, तर पतीकडून पत्नीचे पूजन 

sakal_logo
By
प्रदीप पाटील

नवलनगर (धुळे) : जिजाऊ ब्रिगेडतर्फे लक्ष्मीपूजनानिमित्त सासूने सुनेचे, पतीने पत्नीचे तसेच मातापित्यांनी आपल्या कन्येचे औक्षण केले. 
जिजाऊ, सावित्रीबाई फुले, महाराणी ताराराणी, रमाई आदी महापराक्रमी महिलांचे पूजन करण्यात आले. पत्नी, आई, बहीण, मुलगीही सौभाग्याची लक्ष्मी आहेत. मातीच्या मूर्तीचे पूजनाऐवजी मानवतावादी व वैज्ञानिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून घरात सुना व लेकींच्या पूजनाचे आव्हान केले होते. 

लक्ष्मी रूपाने महिलांचे पूजन
कौटुंबिक कलहाचे प्रमाण राज्यभरात वाढले आहे. अशा पार्श्वभूमीवर कुटुंबामध्ये स्नेहभाव निर्माण व्हावा, म्हणून लेकी व सुनांचे पूजन करण्यात आले. शहरी भागासह ग्रामीण भागात सासूने सुनेचे, तर सुनेने सासूचे औक्षण केले. काही घरांमध्ये माता पित्यांनी आपल्या कन्येच्या पूजन केले. लक्ष्मीच्या रूपाने घरातील महिलांचे पूजन केले. गृहलक्ष्मीला आदराचे स्थान देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला. 
जिजाऊ ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष माधुरी भदाणे यांच्या मार्गदर्शनानुसार धुळे जिल्हा कार्यकारिणीने अनेक कुटुंबांचे समुपदेशन केले. जिजाऊ जिल्हाध्यक्ष नूतन पाटील, राज्य उपाध्यक्ष सुलभा कुंवर, वसुमती पाटील, पूजा भामरे, प्रिया पाटील, सुधर्मा सोनवणे, विद्या सयाजी, रोहिणी पाटील, मराठा सेवा संघ विभागीय अध्यक्ष दीपक भदाणे, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर भदाणे, आजी- माजी जिल्हा पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले. 
 
महिलांना मानाचे स्थान प्राप्त व्हावे, घराघरात महिलांना आदर मिळावा, हा व्यापक विचार करून जिजाऊ ब्रिगेडने ही संकल्पना राज्यभर पोचवण्याचा प्रयत्न केला. राज्यातील चार ते पाच हजार कुटुंबात महिलांचे पूजन झाले. यंदा हा प्रतिसाद चांगला मिळाल्याने पुढील वर्षी व्यापक स्वरूपात हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. 
-माधुरी भदाणे, प्रदेशाध्यक्ष, जिजाऊ ब्रिगेड 
 
धुळे जिल्ह्यात आधुनिक पुरोगामी लक्ष्मीपूजन मोठ्या प्रमाणात व्हावे, यासाठी जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी समुपदेशन केले. उपक्रमास सकारात्मक प्रतिसाद मिळाला. ज्या कुटुंबांनी सक्रिय सहभाग घेतला त्यांचे आभार मानते. 
-नूतन पाटील, जिल्हाध्यक्ष, जिजाऊ ब्रिगेड, धुळे 

संपादन ः राजेश सोनवणे