esakal | एकवीरादेवी मंदिर उघडण्याची परवानगी हवीय 
sakal

बोलून बातमी शोधा

ekvira devi temple

कोरोनामुळे मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून एकवीरादेवी मंदिर बंद आहे. शासनाच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालनही करण्यात येत आहे. मंदिर बंद असल्याने भाविकांना बाहेरूनच दर्शन घ्यावे लागत आहे.

एकवीरादेवी मंदिर उघडण्याची परवानगी हवीय 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धुळे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सहा महिन्यांपासून बंद असलेले शहरातील खानदेश कुलस्वामिनी श्री एकवीरादेवी मंदिर उघडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी श्री एकवीरादेवी व रेणुकामाता मंदिर ट्रस्टने मुख्यमंत्री, पर्यटनमंत्र्यांसह प्रशासनाकडे केली आहे. 
कोरोनामुळे मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून एकवीरादेवी मंदिर बंद आहे. शासनाच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालनही करण्यात येत आहे. मंदिर बंद असल्याने भाविकांना बाहेरूनच दर्शन घ्यावे लागत आहे. रोज किमान २०-२५ भाविक दर्शनासाठी येतात. सणासुदीच्या दिवशी २००-२५० भाविक मंदिर परिसरात जमतात. योग्य अंतर राखून ते दुरूनच दर्शन घेऊन परतात. चैत्र महिन्यातील नवरात्रोत्सव व मार्च ते सप्टेंबरमधील विविध धार्मिक सणही अत्यंत साधेपणाने साजरे करण्यात आले. शासनाने सायंकाळी सहापर्यंत दुकाने सुरू ठेवण्याचा आदेश दिला आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बसही आता पूर्ण क्षमतेने सुरू झाल्या आहेत. फक्त मंदिरांचाच प्रश्‍न प्रलंबित असल्याचे ट्रस्टने म्हटले आहे. 

अटी-शर्तींचे पालन करू 
पुढील महिन्यात एकवीरादेवीचा शारदीय नवरात्रोत्सव सुरू होणार असून, हजारो भाविक दर्शनासाठी येतील. मंदिराला भाविकांच्या देणगीव्यतिरिक्त कोणतेही शासकीय अनुदान नाही. सहा महिन्यांपासून पूजेअर्चेसाठी लागणारा खर्च, कर्मचाऱ्यांचे पगार, वीजबिल देता येणे शक्य झालेले नाही. ही सर्व पार्श्वभूमी लक्षात घेता राजराजेश्‍वरी खानदेश कुलस्वामिनी श्री एकवीरादेवी मंदिर भाविकांसाठी खुले करण्याची परवानगी द्यावी, शासनाचे सर्व नियम व अटी-शर्तींचे योग्य पालन होईल, याची आम्ही ग्वाही देतो, असे ट्रस्टतर्फे मुख्य विश्‍वस्त सोमनाथ गुरव यांनी निवेदनात म्हटले आहे.

loading image