esakal | निवडणूकपूर्व सर्वेक्षणाकडे इच्छुकांचे लक्ष 
sakal

बोलून बातमी शोधा

निवडणूकपूर्व सर्वेक्षणाकडे इच्छुकांचे लक्ष 

निवडणूकपूर्व सर्वेक्षणाकडे इच्छुकांचे लक्ष 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धुळे ः शहरासह जिल्ह्यात "भाजप'मध्ये "इनकमिंग' वाढल्याने निवडणूकपूर्व सर्वेक्षणाचा "फॉर्म्युला' या पक्षाने स्वीकारला आहे. यात सर्व विधानसभा मतदारसंघांत काही संस्थांमार्फत सर्वेक्षण केले जात आहे. किंबहुना ही प्रक्रिया पक्षाने बऱ्यापैकी आटोपली आहे. यानुसार उमेदवारी निश्‍चित करण्याचा भाजपचा निर्णय झाला आहे. त्यामुळे पक्षात उमेदवारीसाठी होत असलेली रस्सीखेच थोपविली जाणार आहे. 

विधानसभेच्या आगामी निवडणुकीपूर्वीच जिल्ह्यातील पाचही मतदारसंघांत इच्छुकांनी दीड महिन्यापूर्वीच प्रचाराला सुरवात केली. विविध शिबिरे, सामाजिक उपक्रमांतून त्यांनी पक्षासह मतदारराजाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न सुरू केला. याद्वारे निवडणूकपूर्व पक्षीय सर्वेक्षणात आपले स्थान बळकट व वरच्या क्रमांकावर येईल, या ईर्षेने इच्छुकांनी काम सुरू केले आहे. 

विरोधकांकडून वरकडी 
सद्यःस्थितीत इच्छुकांची भाजपमध्ये उमेदवारीसाठी कमालीची रस्सीखेच सुरू आहे. शहरासह जिल्ह्यात या पक्षात प्रवेशाचे सोहळे रंगत आहेत. यातून कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व इतर पक्षांना खिंडार पाडण्याची अहमहमिका सुरू झाली आहे. विशेष म्हणजे भाजपच्या कार्यकर्त्यांना कॉंग्रेसमध्ये घेत वरकडी करण्याचा विरोधकांचा प्रयत्न दिसतो आहे. त्यामुळे राजकीय वातावरणात रंगत निर्माण झाली आहे. 

वरच्या क्रमांकावर या..
भाजपच्या स्थानिक इच्छुकांनी माजी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. त्यांच्याकडे उमेदवारीसाठी गळ घातली जात असताना या नेत्यांनी पक्षीय सर्वेक्षणात वरच्या स्थानावर यावे, असे इच्छुकांना सूचित केले. त्यानंतर संबंधित इच्छुकांनी बॅनरबाजी, युवा संवाद, सामाजिक उपक्रमांत अग्रभागी राहणे, कार्यक्रमांना उपस्थिती, शहर विकासाचा अजेंडा मांडणे यासह विविध बाबींवर भर देणे सुरू केले आहे. 

...तर समीकरणे बदलणार 
सत्ताधारी भाजप- शिवसेनेच्या येथील इच्छुकांची उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी सुरू असताना कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रस्थापित नेत्यांनाच उमेदवारीची संधी मिळणार आहे. त्यात विद्यमान आमदारांना उमेदवारी मिळण्याचे संकेत असताना त्यांनी इतर पक्षात प्रवेश केला, तर राजकीय समीकरणे बदलल्याशिवाय राहणार नाहीत. तशी शक्‍यता जिल्ह्यात निर्माणही झाली आहे. 

भाजपचे तीन वेळा सर्वेक्षण 
भाजपचे स्थानिक स्तरावर आतापर्यंत निवडणूकपूर्व तीन वेळा सर्वेक्षण झाले आहे. त्यातील निर्णयाकडे इच्छुकांचे डोळे लागून आहेत. भाजपने विविध पक्षांचे मिळून नऊ ते दहा मातब्बर संभाव्य उमेदवारांची नावे सर्वेक्षणात घेतली. त्यात मतदारराजाने दिलेल्या पसंतीक्रमाच्या आधारावर भाजप स्वउमेदवाराची निवड करेल. 

जागांवरून भाजप- सेनेत रस्सीखेच 
एकीकडे भाजपमध्ये या घडामोडी घडत असताना शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी धुळे शहर व धुळे ग्रामीण मतदारसंघाची जागा मागितली आहे. भाजपच्या स्थानिक नेत्यांनी मात्र यासह पाचही मतदारसंघांतील जागा भाजपलाच मिळतील, असा दावा केला आहे. या स्थितीमुळे युतीमधील या मित्रपक्षांमध्ये जागांवरूनही रस्सीखेच सुरू आहे. या संदर्भात निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. 
 

loading image
go to top