कांदा उत्पादकांचा ‘रास्ता रोको’ 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 15 September 2020

सामोडे चौफुली ते साक्री, सटाणा रस्त्यावर वाहतूक ठप्प होऊन एक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. यावेळी पिंपळनेर पोलिस प्रशासनातर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.

पिंपळनेर (धुळे) : केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यातबंदीचा निर्णय जाहीर केल्याचा येतील सामोडे चौफुलीवर शेतकरी संघटना व कांदा उत्पादक संघटना शेतकऱ्यांनी महामार्गावर सुमारे तासभर रास्ता रोको आंदोलन केले. अप्पर तहसीलदार विनायक थविल यांनी घटनास्थळी येऊन शेतकऱ्यांकडून निवेदन स्वीकारल्यानंतर रस्ता मोकळा करण्यात आला. यावेळी केंद्र सरकारने विश्‍वासघात केल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी निषेध नोंदविला. 
यावेळी शेतकऱ्यांच्या भावना व वेदना शेतकरी संघटनेचे भटू जिभाऊ आकडे व चिकसेचे उपसरपंच संजय जगताप यांनी मांडल्या. यात शेतकरी अस्मानी संकटात सापडलेला असताना मातीमोल भावाने जाणाऱ्या कांद्याला दोन दिवसांपूर्वी भाव मिळाला. मात्र, केंद्र सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात करत कांदा निर्यातबंदी केली. त्यामुळे हे सरकार शेतकऱ्यांच्या जीवावर उठले असून, संताप व्यक्त करत शेतकरी संघटना व कांदा उत्पादक संघटनांनी निषेध व्यक्त केला व सरकारविरोधी घोषणा दिल्या. 
यावेळी चिकसे येथील उपसरपंच संजय जगताप, शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेचे भटू अकलाडे, जगन्नाथ राजपूत, प्रकाश मराठे, शांताराम गांगुर्डे, योगेश जाधव, अंकुश शिसोदिया, पोपट कुवर, हरिभाऊ कोठावदे, पंचायत समिती सदस्य अजय सूर्यवंशी, संजय भदाणे, शिवसेनेचे नानू पगारे, डॉ भूषण एखंडे, डॉ पंकज घरटे, दीपक धायबर, जिभाऊ सूर्यवंशी, सतीश पाटील, भामरे, अनिल मुसळे, निसार शेख, किशोर जाधव, पंकज जाधव, विनायक कुलकर्णी, रावसाहेब शिंदे, जितेंद्र घरटे, सीताराम मानकर, पंकज जाधव, संजय बिरारीस, खुशाल दाभाडे, भूषण भदाणे, निंबाजी पाटील, राहुल भदाणे, प्रवीण देवरे, राहुल अहिरराव, सागर बाबा, यश भदाणे, सह चिकसे, सामोडे, जेबापूर, देगाव, बल्हाणे, विरखेल, शिरवाडे, उंबरे, गणेशपूरसह पिंपळनेर परिसरातून शेकडो शेतकऱ्यांनी ‘रास्ता रोको’त भाग घेतला. आंदोलनानंतर कांदा मार्केट सुरू करण्यात आले. यावेळी २१०० ते २६०० रुपये कांद्याला भाव मिळाला. 

एक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा 
आंदोलनादरम्यान सामोडे चौफुली ते साक्री, सटाणा रस्त्यावर वाहतूक ठप्प होऊन एक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. यावेळी पिंपळनेर पोलिस प्रशासनातर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule farmer block the road on onion export ban