वाढत्या खर्चामुळे उभ्या पिकांत जनावरे सोडण्याची वेळ 

दगाजी देवरे
Saturday, 24 October 2020

शेतकऱ्यांनी भुईमूग आणि तृणधान्यातील बाजरी, मकासारख्या उभ्या पिकात स्वतःच्या पाळीव प्राण्यांसह शेळ्या- मेंढ्या सोडून दिल्या आहेत.

म्हसदी (धुळे) : ‘खेती (शेती) करे धन का नाश’ या उक्तीचा प्रत्यक्ष अनुभव यंदा बळीराजा घेत आहे. मजुरांची उणीव शेतकऱ्यांना डोकेदुखी ठरत आहे. मजुरीही निघणार नाही, याचा अंदाज घेत काही शेतकऱ्यांनी भुईमूग आणि तृणधान्यातील बाजरी, मकासारख्या उभ्या पिकात स्वतःच्या पाळीव प्राण्यांसह शेळ्या- मेंढ्या सोडून दिल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी चाराटंचाईमुळे वणवण भटकणारा शेतकरी यंदा कोरडा चारा मुबलक असल्याने कापून संग्रही करण्यासाठी नाखूश असल्याचे चित्र आहे. 

उत्पादनापेक्षा मजुरी अधिक 
यंदा मुबलक पावसामुळे आरंभापासूनच खरीप पिके दमदार होती. सततचा पाऊस व वातावरणाच्या बदलामुळे भुईमूगसारख्या पिकाचा केवळ चारा गोळा करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. दुसरीकडे कापूस वा मकासारख्या पिकांचे उत्पादन चांगले येणार असले, तरी काढणीसाठी लागणारी मजुरी कंबरडे मोडणारी आहे. खरीप हंगामातील सर्वच पिके काढली जात असल्याने रोकड देऊनही मजूर मिळत नसून, एकाचवेळी शेतीकामे सुरू असल्याने मजुरांची उणीव भासत आहे. 

तृणधान्याची पिके न परवडणारी... 
अलीकडे तृणधान्यातील बाजरी, ज्वारी व मकासारखी पिके वाढत्या खर्चामुळे परवडत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. कारण, अंतर मशागत, पेरणी, कोळपणी, निंदणी, रासायनिक खते देण्यापासून थेट कापणी, काढणीपर्यंत केला जाणारा खर्चाची गोळा बेरीज तोट्यात असल्याचा दरवर्षाचा शेतकऱ्यांना अनुभव आहे, म्हणून भविष्यात कोरडवाहू क्षेत्रातही असली खर्चिक पेरणी करावीत की नाही, हा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत. कोरडवाहू पिकांना कमीच काय जास्त पाऊसही उपयोगी नसल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. यंदा अतिपावसामुळे भुईमूग, सोयाबीन व कडधान्यातील पिकांनी धोका दिला आहे. महागडी बी-बियाणे, रासायनिक खते, वाढती मजुरीचा खर्च करत अशी पिकांची पेरणी करून उपयोग नसल्याचा अनुभव शेतकऱ्यांनी घेतला आहे. काही शेतकरी मजुरीच्या खर्चाची बचत व्हावी, म्हणून कडबा न कापता जनावरे व शेळ्या- मेंढ्या सोडून देत आहेत. 

दिवसेंदिवस शेतीव्यवसाय बिकट होत चालला आहे. यंदा चांगला पाऊस होऊनही हाती काहीच आले नाही. उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक अशी परिस्थिती आहे. भविष्यात किमान कोरडवाहू शेती कशी करावी, हा प्रश्न आहे. स्वतःच्या कुटुंबातील सदस्य शेतीत राबत असतील, तर शेती करणे फायद्याचे ठरेल. अन्यथा ‘खेती करे धन का नाश’, हे सत्य स्वीकारावेच लागेल. 
- साहेबराव पाटील, शेतकरी तथा अध्यक्ष, विविध कार्यकारी सहकारी संस्था, नेर (ता. धुळे)

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule farmer due to rising costs farmer not proffit and animal in farm