कांदा लागवड झाली सोपी; ना मजुर, ना पाण्याची गरज

सुरज खलाणे
Friday, 30 October 2020

उत्पन्नापेक्षा खर्च जास्तीचा असल्यामुळे शेती करणे जिकिरीचे झाले आहे. शेतीला लागणारा खर्च, मजुरीचा खर्च मोठा असल्याने शेतकऱ्यांच्या माथी खर्चाची आकृती वाढत असते. यामुळे मजुरी बचाओ या अनुशंगातून मी ट्रॅक्क्टरच्या साहाय्याने कांद्याची पेरणी करत आहे. यातून कमी खर्चात माझे मोठे क्षेत्र पेरणी होणार आहे.
- राजेंद्र निकुंभे, शेतकरी 

नेर (धुळे) : एकीकडे कांद्याचे दर वाढत असताना शेतकऱ्याचा कल आता कांदा लागवड करण्याकडे आहे. शेतकऱ्यांची तशी लगबग देखील सुरु झाली आहे. दसरा ते दिवाळी या मधल्या काळात कांद्याचे बीज शेतात रोवले जाते. पण कांदा लावण्यासाठी होणारी मशागत आता सोपी झाल्‍याचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी शोधून काढले आहे. ट्रॅक्‍टर यंत्राद्वारे कांद्याची पेरणी करता येणे शक्‍य झाले आहे.

दसऱ्यानंतर कांद्याची लागवड करण्यास सुरवात होत असते. त्‍यानंतर साधारण दीड ते दोन महिन्याच्या कालावधीत कांदा बीजचे रोप तयार होऊन लागवड केली जाते. या लागवडीसाठी मजुरांची गरज भासत असतें. परंतु लागवडीसाठी वेळेवर मजूर उपलब्ध होत नसतात. नेर शेतीशिवार हे ओलिताखाली असल्यामुळे या कांद्याची लागवड करतांना पाण्याचीही मोठी गरज भासते. 

लाईट गेली तर फुकट मजुरी
शेतकऱ्यांना आपल्या भागात कोणत्या दिवशी संपूर्ण दिवस वीज पुरवठा उपलब्ध आहे. या आधारावर कांदा लागवडीचे नियोजन करावे लागत असते. काही वेळा संपूर्ण दिवस वीज पुरवठा असतानाही काही अडथळा आल्यास मजुरांना तेवढा वेळ कांदा लागवडीचे काम बंद ठेवावे लागते. यामुळे शेतकऱ्याला मात्र मोठा तोटा पत्करावा लागतो. त्या दिवसाची मजुरी शेतकऱ्याच्या माथी पडते. 

शेतकऱ्यांची शक्‍कल
येथील शेतकऱ्यांनी आता मोठी शक्कल लढवली आहे. सध्या ट्रॅक्टरच्या माध्यमातून कांद्याची पेरणी करतांना शेतकरी दिसत आहेत. यामुळे पेरणी करतांना मजुरांची तसेच बैल अवजारांची, पाण्याची यावेळी गरज भासत नाही. अंदाजे एक एकर पेरणीसाठी एक ते दीड किलो कांद्याचे बीज लागते. ट्रॅक्टरच्या माध्यमातून संपूर्ण दिवसात दहा ते अकरा एकर लागवड केली जाते. पेरणी झाल्यावर कोणत्याही प्रकारचे श्रम न घेता. पेरणी झालेल्या शेतालानंतर पाणी देता येऊ शकते. यामुळे येथील शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे. 

अशी होते लागवड
मोठ्या बागायतदार शेतकऱ्यांची दिवसात चांगल्या प्रमाणात पेरणी होत असते. ट्रॅक्टरच्या मागील भागास हे यंत्र बसविले जाते. या यंत्राच्यावरील भागास एक आयताकृती डब्बा असतो कांद्याचे बीज यात टाकले जाते. फक्त ट्रॅक्टर चालकाच्या सहाय्याने कांदा पिकाची पेरणी केली जाते. यावेळी येथील शेतकरी राजेंद्र निकुंभे, विलास महाजन, पिंटू जाधव, शशिकांत जाधव आदी उपस्थित होते. 

 

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule farmer onion planting was easy