esakal | आयसीयू, ऑक्सिजन बेडसाठी धुळे पालकमंत्र्यांकडून मिळाला चार कोटींचा निधी 
sakal

बोलून बातमी शोधा

आयसीयू, ऑक्सिजन बेडसाठी धुळे पालकमंत्र्यांकडून मिळाला चार कोटींचा निधी 

पालकमंत्र्यांकडून जिल्हा नियोजन मंडळाकडून चार कोटींचा निधी उपलब्ध होत आहे. यात जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात विविध सोयी-सुविधांची क्षमतावृद्धी होणार आहे.

आयसीयू, ऑक्सिजन बेडसाठी धुळे पालकमंत्र्यांकडून मिळाला चार कोटींचा निधी 

sakal_logo
By
निखील सुर्यवंशी

धुळे : जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या पुढाकाराने जिल्हा नियोजन मंडळातून चार कोटींचा निधी दिला जात आहे. यातून आयसीयू, ऑक्सिजन सुविधायुक्त खाटांची क्षमता वाढविली जाणार आहे. तसेच कोरोना रुग्णांसाठी वाढविल्या जाणाऱ्या सोयी-सुविधांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते शनिवारी (ता. १५) स्वातंत्र्यदिनी उद्‌घाटन होईल. त्याच्या तयारीत यंत्रणा जुंपली आहे. 


सद्यःस्थितीत हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात सर्वाधिक दीडशेहून अधिक बाधित रुग्ण आहेत. काही दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात प्रतिदिन सरासरी शंभर ते दीडशे बाधित रुग्ण आढळत असल्याने खाटांची मागणी वाढली आहे. जिल्हाधिकारी संजय यादव यांनी पालकमंत्री सत्तार यांना जिल्ह्यातील स्थिती लक्षात आणून देत निधीची गरज व्यक्त केली. त्यामुळे पालकमंत्र्यांकडून जिल्हा नियोजन मंडळाकडून चार कोटींचा निधी उपलब्ध होत आहे. यात जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात विविध सोयी-सुविधांची क्षमतावृद्धी होणार आहे. सर्वोपचार रुग्णालयात सद्यःस्थितीत ४५ खाटांचा आयसीयू कक्ष आहे. तेथे कोरोनाचे ३९ गंभीर रुग्ण उपचार घेत आहेत.

शिवाय रुग्णालयात ५५ खाटांच्या सुसज्ज आयसीयू कक्षाची तयारी सुरू आहे. सर्वोपचार रुग्णालयात सध्या कोविडचे आठ वॉर्ड आहेत. तेथे प्रत्येकी ३० खाटा आहेत. अशा एकूण २४० खाटा सज्ज आहेत. त्यात १२५ खाटांना ऑक्सिजन पॉइंट आहेत. या स्थितीत आणखी ६० खाटा वाढविण्याची तयारी महाविद्यालय व्यवस्थापनाने सुरू केली आहे. 


महापालिकेने खाटा वाढीसाठी पुढाकार घेतला आहे. साक्री रस्त्यावरील जिल्हा रुग्णालयाच्या आवारातील जुना बालरुग्ण विभाग, कान- नाक- घसा विभागाच्या इमारतीत सुरवातीला ५० खाटा वाढीसाठी तयारी सुरू झाली आहे. यात ऑक्सिजन पॉइंट दिले जातील. या रुग्णालयात रंगरंगोटीसह इमारतींचे नूतनीकरण झाले आहे. त्यामुळे तेथे सरासरी ३०० खाटांची व्यवस्था होऊ शकते.

टप्प्याटप्प्याने त्या वाढीसाठी जिल्हा रुग्णालय, महापालिकेला प्रयत्न करावे लागतील. तसेच साक्री रस्त्यावरील जवाहर मेडिकल फाउंडेशनचे रुग्णालय नॉनकोविड रुग्णांसाठी उपयोगात येत आहे. या रुग्णालयाच्या काही इमारती आहेत. पैकी एका इमारतीत शंभर खाटांचे कोविड केअर सेंटर सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी यादव प्रयत्नशील आहेत. 

संपादन-भूषण श्रीखंडे