esakal | धुळ्यात बाप्पाला भक्तिभावाने निरोप; कृत्रिम तलावांमध्ये मूर्ती विसर्जन 
sakal

बोलून बातमी शोधा

धुळ्यात बाप्पाला भक्तिभावाने निरोप; कृत्रिम तलावांमध्ये मूर्ती विसर्जन 

गर्दी टाळण्यासाठीच मूर्ती विसर्जनासाठी महापालिकेने शहराच्या विविध ३७ ठिकाणी कृत्रिम तलाव (हौद) ठेवले होते. त्या तलावांमध्ये नागरिकांनी गणेशमूर्ती विसर्जित केल्या.

धुळ्यात बाप्पाला भक्तिभावाने निरोप; कृत्रिम तलावांमध्ये मूर्ती विसर्जन 

sakal_logo
By
रमाकांत घोडराज

धुळे ः ‘कोरोना’च्या संकटामुळे यंदा गणेशोत्सवाची धामधूम पाहावयास मिळाली नाही, गर्दी होऊ नये यासाठी विसर्जन मिरवणुकांवरही बंदी असल्याने गणेशमूर्ती विसर्जनाच्या दिवशी शिगेला पोहोचणारा उत्साहही अनुभवता आला नाही. मात्र, आपल्या लाडक्या बाप्पाला नागरिकांसह सार्वजनिक गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी तितक्याच भक्तिभावाने निरोप दिला. जिल्हा प्रशासन, महापालिका व पोलिस प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत गणेशभक्तांनी शहराच्या विविध भागांत ठेवलेल्या कृत्रिम तलावात (हौद) गणेशमूर्ती विसर्जित केल्या. 

कोरोना विषाणू संसर्गामुळे यंदा सर्वच धर्मीयांना सण-उत्सव साजरे करण्यावर काही निर्बंध आले. गेल्या दहा दिवसांपासून गणेशोत्सवाचा नूरही दरवर्षीपेक्षा फिकाच होता. मात्र, गणरायाप्रती गणेशभक्तांचा मनोमनीचा उत्साह कायम होता. गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीच्या निमित्ताने या उत्साहाला उधाण येते. यंदा मात्र गणेशभक्तांना त्याला मुरड घालावी लागली. ‘कोरोना’ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मिरवणुकीसह नागरिकांना गर्दी करण्यास प्रतिबंध घालण्यात आला होता. गर्दी टाळण्यासाठीच मूर्ती विसर्जनासाठी महापालिकेने शहराच्या विविध ३७ ठिकाणी कृत्रिम तलाव (हौद) ठेवले होते. त्या तलावांमध्ये नागरिकांनी गणेशमूर्ती विसर्जित केल्या. शहरातील ६२ सार्वजनिक गणेश मंडळांसह घरगुती गणेशमूर्तींचे त्या-त्या भागात विसर्जन झाले. भाविकांनीही मोठ्या भक्तिभावाने लाडक्या बाप्पाला निरोप दिला. 

्अधिकाऱ्यांचा पुढाकार 
गणेश विसर्जनादरम्यान कुठेही गर्दी होणार नाही, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होणार नाही यासाठी पोलिस प्रशासन सजग होते. शहराच्या विविध भागांत वरिष्ठ अधिकाऱ्यांची नजर होती. नागरिकांनीही चांगला प्रतिसाद दिल्याने पोलिसांवरचा ताण कमी झालेला पाहावयास मिळाला. जिल्हाधिकारी संजय यादव, महापालिका आयुक्त अजीज शेख, पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलिस अधीक्षक राजू भुजबळ, डीवायएसपी सचिन हिरे आदींनी विविध भागांत व्यवस्थेची पाहणी केली. जिल्हा पोलिस अधीक्षक पंडित यांनी स्वतः आपल्या घरगुती गणपतीचे आई-वडिलांच्या हस्ते गांधी पुतळा चौकातील कृत्रिम तलावात विसर्जन केले. गणेश विसर्जन करणाऱ्या भाविकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मानाच्या हिंदू एकता गणेशोत्सव मंडळाने गणेशमूर्तीचे आहे त्या ठिकाणीच विसर्जन केले. तत्पूर्वी डीवायएसपी हिरे, आझादनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिनेश आहेर यांच्या हस्ते गणेशाची आरती झाली. नगरसेवक हर्शकुमार रेलन, महापालिका उपायुक्त शांताराम गोसावी, लेखाधिकारी नामदेव भामरे, मंडळाचे अध्यक्ष हिरामण गवळी, अनिल थोरात, पवन गवळी, छोटू चौधरी, यशवंत चौधरी आदी उपस्थित होते. 


महापालिकेकडून व्यवस्था 
गणपती विसर्जनासाठी महापालिकेने ३७ ठिकाणी कृत्रिम तलाव ठेवले होते. तर गणेशमूर्ती संकलनासाठी राज्य परिवहन महामंडळाने २० बस उपलब्ध करून दिलेल्या होत्या. मूर्ती व निर्माल्य संकलनासह सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेसाठी महापालिकेने कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. महापालिकेचे इतर अधिकारी-कर्मचारी व्यवस्थेवर लक्ष ठेवून होते. सर्वच पोलीस ठाण्यांचे अधिकारी-कर्मचारी, होमगार्ड आणि राज्य राखीव पोलीस दलाचे कमर्र्चारी ठिकठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात होते. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image
go to top