‘घटबारी’मुळे पाच हजार एकर क्षेत्र ओलिताखाली; लोकसहभागातून जलक्रांती 

प्रा.भगवान जगदाळे
Saturday, 31 October 2020

घटबारी बांधाच्या उभारणीसाठी औरंगाबादच्या महात्मा फुले कृषी प्रतिष्ठानतर्फे चार लाख, तर देशबंधू मंजूगुप्ता फाउंडेशनतर्फे दीड लाखाची भरीव आर्थिक मदत उपलब्ध झाली होती. लोकवर्गणीतून सुमारे तीन ते साडेतीन लाख रुपये निधी जमवून ५६लाख रुपये खर्च अपेक्षित असलेला हा बांध अवघ्या नऊ लाखातच पूर्ण झाला.

निजामपूर (धुळे) : माळमाथा परिसरातील डोमकानी शिवारातील ३ ऑक्टोबर २०१६ला रात्री फुटलेला घटबारी पाझर तलावाचा बांध खुडाणे (ता. साक्री) येथील ग्रामस्थांच्या पुढाकाराने, लोकसहभाग, लोकवर्गणी व श्रमदानातून अल्पावधीतच पूर्ण झाला. आबालवृध्दांसह तरुण, महिला व गावकऱ्यांनी २०मे २०१७ला सुरू केलेले हे महत्त्वाकांक्षी काम. जुलै २०१७पर्यंत पूर्ण केले. ५६लाखांचे काम अवघ्या नऊ लाखात पूर्ण झाल्याने जनतेसह शासकीय यंत्रणेनेही तोंडात बोटे घातली. 

घटबारी बांधाच्या उभारणीसाठी औरंगाबादच्या महात्मा फुले कृषी प्रतिष्ठानतर्फे चार लाख, तर देशबंधू मंजूगुप्ता फाउंडेशनतर्फे दीड लाखाची भरीव आर्थिक मदत उपलब्ध झाली होती. लोकवर्गणीतून सुमारे तीन ते साडेतीन लाख रुपये निधी जमवून ५६लाख रुपये खर्च अपेक्षित असलेला हा बांध अवघ्या नऊ लाखातच पूर्ण झाला. ‘घटबारी’मुळे शेतकऱ्यांची सुमारे ४ ते ५ हजार एकर जमीन ओलिताखाली आली असून हजारावर शेतकऱ्यांना त्याचा लाभ झालेला आहे. ‘घटबारी’ परिसरातील विहिरी व कुपनलिकांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने शेतीत पिके चांगली येतात. ‘घटबारी’मुळे ग्रामस्थांसह मुक्या प्राण्यांची पाण्याची सोय झाली आहे. खुडाणे व डोमकानी ही दोन्ही गावे वगळता अन्यत्र पाच किलोमीटर परिसरात गुराढोरांसाठी पाण्याचे दुर्भिक्ष होते, पण घटबारीमुळे ती समस्या निकाली निघाली आहे. उन्हाळ्यात पुरेल एवढा जलसाठा आज शिल्लक आहे. 

बांध फुटल्‍यानंतर
घटबारीचा बांध फुटल्यानंतर परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या सुमारे बाराशे एकर शेतजमिनीचा पंचनामा झाला होता. सुमारे साडेचारशे ते पाचशे विहिरी बुजल्या गेल्या होत्या. उभी पिके नष्ट झाली होती. गुरे-ढोरे मृत्युमुखी पडली होती. काही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली, तर काहींना अद्याप मोबदला मिळाला नसल्याचे समजते. घटबारीचा बांध फुटल्यानंतर व त्याची उभारणी झाल्यानंतर मतदार संघातील आमदार, खासदारांकडून ‘पाहणी दौरा’ व ‘आश्वासने’ याव्यतिरिक्त ठोस भरीव आर्थिक मदत मिळाली नसल्याचे व वनविभागासह कृषी विभागानेही पाहिजे तेवढी आर्थिक मदत केली नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. 

श्रमदान, लोकवर्गणी व लोकसहभागातून सुरू केलेल्या ‘घटबारी’च्या कामाचे पहिले सविस्तर वृत्त ‘सकाळ’ने प्रकाशित केले होते. त्यामुळे लोकसहभागातून सुरू केलेल्या ह्या चळवळीला अधिक बळ मिळाले. घटबारीच्या पुनर्निर्माणाचे खरे श्रेय खुडाणे ग्रामस्थांसह खुडाणे ग्रामपंचायत, घटबारी जलसंधारण समिती, स्थानिक ट्रॅक्टर युनियन, अनुलोम,देशबंधू मंजूगुप्ता फाउंडेशन, महात्मा फुले कृषी प्रतिष्ठान यांच्यासह ज्यांनी श्रमदानासह आर्थिक योगदान दिले अशांना जाते. त्यामुळे ‘घटबारी’चे श्रेय लाटण्याचा प्रयत्न कोणत्याही राजकीय पक्षाने अथवा लोकप्रतिनिधीने करू नये. 
- पराग माळी, युवा कार्यकर्ते, खुडाणे 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule ghatbari bandh five thousand ekar aria water lavel