चाकूचा धाक दाखवत मुलीला पळवून नेत अत्‍याचार

एल. बी. चौधरी
Sunday, 22 November 2020

संशयितांनी संगनमत करून तिच्या पालकांच्या ताब्यातून चाकूचा व वस्ताऱ्याचा धाक दाखवत तिला पळवून नेले. 

सोनगीर (धुळे) : न्याहळोद (ता. धुळे) येथील एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचार प्रकरणी तीन संशयितांना अटक करण्यात आली आहे. ही घटना बुधवारी (ता. 18) घडली. मात्र या प्रकरणी शनिवारी मध्यरात्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

चोपडाई कोंढावळ (ता. अमळनेर) येथील मुळ रहिवासी व सध्या न्याहळोद येथे मुक्कामी असलेली एका अल्पवयीन मुलीला गावातील लक्ष्मण भिवराज महाले, सचिन ज्ञानेश्वर पवार, कांतीलाल कैलास पवार या संशयितांनी संगनमत करून तिच्या पालकांच्या ताब्यातून चाकूचा व वस्ताऱ्याचा धाक दाखवत तिला पळवून नेले. 

तिघांनी केला अत्‍याचार
नगाव ते गोंदूर मार्गावरील एक शेतात सायंकाळी साडेसात ते साडेआठच्या दरम्यान पीडित मुलीवर तिघांनी अत्याचार केला. याप्रकरणी पीडित मुलीने आपल्या नातेवाईकांना माहिती दिली. त्यावरून शनिवारी मध्यरात्री सोनगीर पोलिसात संशयितांविरुध्द गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल झाल्‍यानंतर संशयीतांना ताब्‍यात घेण्यात आले असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीण निकाळजे हे करीत आहेत.

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule girl torture three boy police arrested