मृतदेहांची आबाळ थांबविणार कोण? 

निखिल सूर्यवंशी
गुरुवार, 30 एप्रिल 2020

कोरोना'बाधित व्यक्तीच्या मृत्यूनंतरही त्याच्या नरकयातनांना सुरवात होते. डॉक्‍टरांकडून कागदोपत्री सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर बाधित व्यक्तीचा मृतदेह जिल्हा रुग्णालयाबाहेर येतो. नंतर तो मृतदेह उचलावा कुणी, यावरून खल सुरू होतो.

धुळे : संसर्गजन्य "कोरोना व्हायरस'मुळे संवेदना बोथट होऊ लागल्या आहेत. त्याचा प्रत्यय "कोरोना'बाधित रुग्णांच्या मृत्यूनंतर येत आहे. अशा रुग्णांचा मृतदेह नातेवाइकांनीच उचलावा, अशी गळ सरकारी कर्मचारी घालतात; तर सरकारी कर्मचाऱ्यांना संरक्षित कपडे (पीपीई), वस्तू, साधने शासनाने पुरविल्यामुळे त्यांनीच मृतदेह उचलावा, असा आग्रह नातेवाईक धरतात. या द्वंद्वात तासन्‌तास मृतदेह पडून राहत असल्याने त्याची अक्षरशः आबाळ, विटंबना होत आहे. याप्रश्‍नी मार्गदर्शक तत्त्वांनुसार जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, तहसीलदार, पोलिस अधीक्षकांनी ठोस निर्णय घेण्याची गरज आहे. 
"कोरोना'बाधित व्यक्तीच्या मृत्यूनंतरही त्याच्या नरकयातनांना सुरवात होते. डॉक्‍टरांकडून कागदोपत्री सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर बाधित व्यक्तीचा मृतदेह जिल्हा रुग्णालयाबाहेर येतो. नंतर तो मृतदेह उचलावा कुणी, यावरून खल सुरू होतो. मृतदेहाला "सॅनिटाइझ' केल्यानंतर विशिष्ट प्रकारचे प्लास्टिकचे आवरण घातले जाते. जेणेकरून "कोरोना' संसर्ग रोखता येऊ शकतो. ही प्रक्रिया पार पाडल्यानंतर शारीरिक अंतर राखत संबंधित सरकारी कर्मचारी व त्या मृत व्यक्तीचे नातेवाईक उभे असतात. "सॅनिटाइझ' झालेली रुग्णवाहिका येते इथपर्यंत ही प्रक्रिया पार पडते. 

अनामिक भीती अन्‌ हमरीतुमरी 
यानंतर त्या "कोरोना'बाधित व्यक्तीचा मृतदेह उचलावा कुणी, यावरून सरकारी कर्मचारी व नातेवाइकांमध्ये हमरीतुमरी सुरू होते. दोन्ही घटकांना चुकून आपल्यालाही "कोरोना'ची बाधा होऊ नये, असे नैसर्गिकरीत्या वाटत असते. त्यांच्यात अनामिक भीती असते. त्यामुळे बराच वेळ मृतदेह तुम्ही उचला, असे एकमेकांना सांगण्यात सरकारी कर्मचारी व नातेवाईक वेळ घालवितात. या वादात जोखीम पत्करून जनतेचे रक्षण करणारे पोलिस काहीच करू शकत नाहीत. याप्रश्‍नी कुणीही सामंजस्याची भूमिका घेण्यास तयार नसतो, ही वास्तव स्थिती आहे. 

धुळ्यातील मृत तरुणाची स्थिती 
धुळे शहरात एका राजकीय कुटुंबाशी निगडित रेल्वेस्थानक भागातील 28 वर्षीय "कोरोना'बाधित तरुणाचा मृत्यू झाला होता. त्याचा मृतदेह उचलण्यासाठी जिल्हा सर्वोपचार रुग्णालयातील किंवा जिल्हा सरकारी यंत्रणेकडून नियुक्त कर्मचारी अथवा नातेवाईक सायंकाळनंतर पुढे येत नव्हते. शेवटी एका माजी लोकप्रतिनिधीने रुग्णालयातील दोन कर्मचाऱ्यांना पैसे दिले, तेव्हा त्या तरुणाचा मृतदेह उचलला गेला व रुग्णवाहिकेत ठेवण्यात आला. तेथून तो थेट देवपूरमधील अमरधाममध्ये नेण्यात आला. तेथेही महापालिकेचे कर्मचारी तो मृतदेह उचलण्यास तयार नव्हते. मार्गदर्शक तत्त्वांनुसार कर्मचारी फक्त देखरेख ठेवतील, काही अंतरावर थांबणाऱ्या नातेवाइकांनी मृतदेह उचलून अंत्यसंस्कारासाठी ठेवावा, असे एकमेकांना सांगितले जात होते. यावरून अडीच तास घासाघीस चालली. शेवटी काही व्यक्तींनी मृतदेह उचलून ठेवला. 

वृद्धाची मरणोनंतरही आबाळ 
जिल्हा रुग्णालयात साक्री येथील 80 वर्षीय "कोरोना'बाधित वृद्धाचा आज (बुधवार) पहाटे मृत्यू झाला. त्याचा मृतदेह कुणी उचलावा आणि अंत्यसंस्कार कुठे करावेत, यावरून रात्री आठपर्यंत खल सुरू होता. त्यामुळे वृद्धाचा मृतदेह पंधरा तास पडून होता. साक्रीतील सामाजिक कार्यकर्ते पंकज मराठे यांनी इतर काही अधिकारी दाद देत नसल्याने अखेर जिल्हाधिकारी संजय यादव यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी महापालिका आयुक्त, पोलिसांना सूचना देऊन हा प्रश्‍न सोडवितो, असे श्री. मराठे यांना सांगितले. याप्रश्‍नी अधिकारी व नातेवाइकांनी एकमेकांना दूषणे देण्यापेक्षा, मृतदेहाची विटंबना, आबाळ टाळण्यासाठी काय ठोस मार्ग काढता येईल, यावर तत्काळ विचार केला पाहिजे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule goverment hospital corona virus