सोनगीरला साडेबारा कोटींची शासकीय निवासी आश्रमशाळा 

एल. बी. चौधरी
Sunday, 6 December 2020

सहावी ते दहावीपर्यंतचे वर्ग आहेत. सध्या भाडेतत्त्वाच्या इमारतीत शाळा भरते. लवकरच ही आश्रमशाळा नवीन भव्य इमारतीत स्थलांतरित होईल. नवीन इमारत तीन मजली असून, त्यात २२ खोल्या आहेत.

सोनगीर (धुळे) : येथे राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे अनुसूचित जाती व नवबौद्ध शासकीय निवासी आश्रमशाळेची साडेबारा कोटींची भव्य इमारत उभी राहत असून, ती गावाच्या विकासात भर घालणारी महत्त्वपूर्ण वास्तू ठरणार आहे.

येथे २०११-१२ पासून दोनशे विद्यार्थ्यांसाठी निवासी आश्रमशाळा असून, त्यात ८० टक्के अनुसूचित जाती, दहा टक्के अनुसूचित जमाती, तीन टक्के अपंग, पाच टक्के विमुक्त व भटक्या जमाती, दोन टक्के विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. सहावी ते दहावीपर्यंतचे वर्ग आहेत. सध्या भाडेतत्त्वाच्या इमारतीत शाळा भरते. लवकरच ही आश्रमशाळा नवीन भव्य इमारतीत स्थलांतरित होईल. नवीन इमारत तीन मजली असून, त्यात २२ खोल्या आहेत. भिंतीचे भव्य कंपाऊंड व गेट तयार होत आहे. ऐसपैस क्रीडांगण आहे. विद्यार्थ्यांना स्वच्छ व शुद्ध आरओचे पाणी मिळण्याची व्यवस्था, ई- लर्निंग ग्रंथालय व निवासाच्या दृष्टिकोनातून सर्व सुविधा उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांना खाण्या-पिण्याची व्यवस्था आहे. आश्रमशाळा सुरू होऊन अवघ्या सहाव्या वर्षी २०१७ मध्ये शाळेला आयएसओ ९००१:२०१५ मानांकन मिळाले आहे. दिल्लीतील क्वालिटी कंट्रोल विभागाकडून हे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. शाळा व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्याध्यापक, शिक्षक व इतर सर्व घटक तनमनधनाने प्रयत्न करीत आहेत. शाखा अभियंता ए. डी. राव व उपअभियंता सी. के. वाणी यांच्या देखरेखीखाली इमारत साकारत आहे. 

राज्य शासनाने २०११- १२ मध्ये राज्यभर तालुकास्तरावर सेमी इंग्रजी आश्रमशाळा सुरू केल्या. मोफत राहण्याची व खाण्याची व्यवस्था असून, तज्ज्ञ शिक्षकांमुळे दहावीचा निकाल शंभर टक्के लागतो. नवीन इमारतीत अधिक सुविधा मिळणार आहेत. 
एस. बी. वाणी, मुख्याध्यापिका 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule goverment residential ashram school in songir