esakal | ग्रामपंचायत निवडणुक : धुळे जिल्ह्यात ७४५ प्रभागांत रणधुमाळी 
sakal

बोलून बातमी शोधा

elections

विकासात्मक मुद्दे रस्ते, पाणी व गटारी या प्रश्नाभोवती फिरणार की नवीन आश्वासन उमेदवार देतात, याकडे ग्रामस्थांचे लक्ष आहे.

ग्रामपंचायत निवडणुक : धुळे जिल्ह्यात ७४५ प्रभागांत रणधुमाळी 

sakal_logo
By
प्रदीप पाटील

नवलनगर : ग्रामपंचायत निवडणुकीत धुळे जिल्ह्यात ७४५ प्रभागांतून एक हजार ९८३ सदस्य निवडले जाणार आहेत. २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरवात होत आहे. ४ जानेवारीला अर्ज मागे घेतल्यानंतर तिरंगी की चौरंगी लढत, याचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे. 

आवश्य वाचा- घरी आलेल्‍या पत्‍नीने दरवाजा उघडताच फोडला हंबरडा

सदस्यांचे आरक्षण जाहीर झाले. मात्र, सरपंचपदाचे आरक्षण निवडणुकीनंतर होणार आहे. प्रत्येक प्रभागातून इच्छुकांची संख्या लक्षणीय आहे. युवकांचा निवडणुकीत सहभाग मोठा असणार आहे. आजी- माजी पदाधिकारी प्रभागनिहाय कोणता उमेदवार दिल्यास यशस्वी होईल, याची चाचपणी करीत आहेत.

मतदारा पर्यंत पोहचण्यासाठी सोशल मिडीयाचा वापर

बाहेरगावाला असणाऱ्या मतदानाची काळजी घेण्यासाठी इच्छुक सज्ज झाले आहेत. प्रत्येक प्रभागातून उमेदवार कसा निघेल, याचे नियोजन गटनेते करीत आहेत. विकासात्मक मुद्दे रस्ते, पाणी व गटारी या प्रश्नाभोवती फिरणार की नवीन आश्वासन उमेदवार देतात, याकडे ग्रामस्थांचे लक्ष आहे. भाऊबंदकी, आर्थिक सक्षमता या सर्व निकषांचा विचार उमेदवार देताना गृहीत धरला जातो. गावातील सोशल मीडिया ग्रुपला महत्त्व आले आहे.

पदाधिकाऱ्य़ाच्या बैठका सुरू

मतदारांचे मागचे रुसवे-फुगवे यानिमित्त काढण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. पक्ष आपले जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडून येतील, यासाठी जिल्हा स्तरावरून बांधणी करीत आहेत. पॅनल कसे देणार याबाबत पदाधिकाऱ्यांच्या बैठका सुरू झाल्या आहेत. नवीन पोरांना आता संधी द्या, अशी काही ज्येष्ठ ग्रामस्थांची अपेक्षा आहे. १७, १३, ११ व ९ सदस्यसंख्या असणाऱ्या ग्रामपंचायतींवर विशेष लक्ष दिले जात आहे. गावातील सामाजिक कामात अग्रेसर असणारा, तालुका व जिल्हा स्तरावर संपर्क ठेवणारा, अडचणीप्रसंगी धावून जाणारा व गावाच्या विकासासाठी झटणारा अशा अभ्यासू उमेदवारांना जास्तीत जास्त संधी मिळणे ग्रामस्थांना अपेक्षित आहे. 

आवर्जून वाचा- बालिकेचा बळी तरीही प्रशासन गंभीर नाही; ठेकेदाराची पाठराखण 
 

ग्रामपंचायतीत निवडून येणारी सदस्यसंख्या 
धुळे तालुक्यातील ७२ ग्रामपंचायतींच्या २५६ प्रभागांतून ६९४ सदस्य निवडले जाणार आहेत. शिंदखेडा तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतींमधून १९९ प्रभागांतून ५०६ सदस्य निवडले जाणार आहेत. साक्री तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींच्या १७५ प्रभागांतून ४६९ सदस्य निवडले जाणार आहेत. शिरपूर तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींमधून ११५ प्रभागांतून ३१४ सदस्य निवडले जाणार आहेत. जिल्ह्यातील २१८ ग्रामपंचायतींच्या ७४५ प्रभागांतून एक हजार ९८३ उमेदवार निवडले जाणार आहेत. बऱ्याच गावांमध्ये बिनविरोध निवडणूक व्हावी, यासाठीही प्रयत्न सुरू झाले आहेत.  

संपादन- भूषण श्रीखंडे 
 

loading image