विधानसभा नव्हे ग्रामपंचायत निवडणूक तरी यादीत दोन हजार मतदारांची अदलाबदल

एल. बी. चौधरी
Tuesday, 8 December 2020

ग्रामपंचायत निवडणूकीसाठी प्रशासन सज्ज झाले असून मतदारयादी वाचनानंतर त्याच दिवशी रात्रीतूनच मतदारयादीत घोळ झाल्याचा आरोप होऊन तक्रारी सुरू झाल्या.

सोनगीर (धुळे) : ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच गाजू लागली असून निवडून येण्यासाठी इच्छुकांनी अन्य प्रभागातील मतदारांची नावे आपल्या प्रभागात नोंदवून घेतली. सुमारे दोन हजार मतदारांचा घोळ झाला असून अकरा ग्रामस्थांनी मतदार यादीवर हरकत घेतली आहे. हरकतींवर आज (ता. 8) सुनावणी झाली असून नवीन मतदार यादी तयार होईल. आजही किरकोळ गोंधळ झाल्याने निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच गाजू लागली आहे. 
ग्रामपंचायत निवडणूकीसाठी प्रशासन सज्ज झाले असून मतदारयादी वाचनानंतर त्याच दिवशी रात्रीतूनच मतदारयादीत घोळ झाल्याचा आरोप होऊन तक्रारी सुरू झाल्या. सोमवारी (ता. 7) आर. के. माळी, राजेंद्र जाधव, दिनेश देवरे, शाम माळी, प्रमोद धनगर, केदारेश्वर मोरे, मनुकुमार पटेल, शेरूखान पठाण, समाधान पाटील, राजू पाडवी, प्रवीण भोई आदी दहा ग्रामस्थांनी प्रारूप मतदार यादीवर हरकत घेतली. घोळ झालेल्या मतदारांना पुन्हा मुळ प्रभागात ठेवण्यात आले. मात्र निवडून येण्यासाठी काही इच्छुकांनी मतदार याद्यांमध्येच घोळ केला त्याबाबत आश्चर्य वाटते. सुनावणीनंतर नवीन मतदारयादी जिल्हाधिकारींकडे सादर होऊन नव्याने मतदार यादी प्रसिद्ध होईल असे सांगण्यात आले. मंडळ अधिकारी आर. बी. राजपूत व तलाठी जितेंद्र चव्हाण यांनी सुनावणीचे काम पाहिले. 

सरपंचाच्या आरक्षणानंतर खरी रंगत
दरम्यान सरपंचपदाच्या आरक्षणाकडे सर्वांचे लक्ष लागले असून त्यानंतर खऱ्या अर्थाने निवडणुकीची तयारी व रंगत भरायला सुरूवात होईल. इच्छुकांच्या हालचालींना सुरवात झाली असून अनेकांची उमेदवारी त्यांचा समाज काय निर्णय घेतो त्यावर अवलंबून आहे. यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौधरी, पंचायत समितीचे माजी सदस्य अविनाश महाजन, पंचायत समिती सदस्य चेतन चौधरी, आर. के. माळी, माजी सरपंच केदारेश्वर मोरे, प्रमोद धनगर, संदीप गुजर, पराग देशमुख, आरिफ पठाण, विशाल मोरे, किशोर पावनकर, मनुकुमार पटेल, सरदार कुरेशी, शफीयोददीन पठाण, नितीन निझर, जितेंद्र बागुल आदी उपस्थित होते.

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule gram panchayat election voter list name change