esakal | दिल्‍लीत राहून दोन कोटी लांबविले अन्‌ हॅकर्स सापडले तावडीत
sakal

बोलून बातमी शोधा

hackers

हॅकर्सने नवी दिल्लीत बसून ॲक्सीस बँकेला ऑनलाइन गंडा घातला आहे. या प्रकरणी बँक व्यवस्थापक धनेश नामदेव सगळे यांनी धुळे शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

दिल्‍लीत राहून दोन कोटी लांबविले अन्‌ हॅकर्स सापडले तावडीत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

धुळे : येथील धुळे विकास सहकारी बँकेचे स्थानिक ॲक्सीस बँकेत खाते आहे. त्यातून हॅकर्सने तब्बल दोन कोटी रुपये लांबविले. या हायटेक आणि गुंतागुंतीच्या गुन्ह्याची उकल करण्यात स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेला (एलसीबी) यश आले. कारवाई पथकाने महिलेसह पाच हॅकर्सला नवी दिल्लीतून अटक केली आहे. त्यात नायजेरीयाच्या संशयिताचा समावेश आहे. 
हॅकर्सने नवी दिल्लीत बसून ॲक्सीस बँकेला ऑनलाइन गंडा घातला आहे. या प्रकरणी बँक व्यवस्थापक धनेश नामदेव सगळे यांनी धुळे शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याआधारे `एलसीबी`ने तपास सुरू केला. पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी तपासासाठी तांत्रिक विश्‍लेषण आणि अटकेच्या कारवाईसाठी दोन स्वतंत्र पथके स्थापन केली. याकामी विशेष सेल स्थापन करत सायबर तज्ज्ञ ब्रजेश गुजराथी यांची नियुक्ती केली. 

११७ बँक खात्यात वर्ग 
ॲक्सीस बँकेतील धुळे विकास सहकारी बँकेच्या खात्यातून हॅकर्सने ६ जूनला दोन कोटी रुपये काढून घेतले. ते सामान्य व्यक्तींच्या नावे बनावट कागदपत्र तयार करून देशातील ठिकठिकाणच्या १८ बँकेतील २७ खात्यांवर वेगवेगळ्या रकमेव्दारे परस्पर वर्ग केले. `एलसीबी`ने १८ बँकांशी संपर्क साधत संबंधित २७ खातेधारकांची माहिती संकलित केली. तसेच त्या खात्यातील रक्कम गोठविण्यात आली. हॅकर्सने दोन कोटी रुपये देशात वेगवेगळ्या रकमेव्दारे प्रथम २७, नंतर ६९ आणि पुढे २१, असे एकूण ११७ विविध बँक खात्यात वर्ग केले. त्या बँकांशी संपर्क साधून `एलसीबी`ने ८८ लाख ८१ हजार १७३ रुपये गोठवत वाचविले. 

दिल्लीत मुद्देमाल जप्त 
तपासात खातेउतारे, `केवायसी`वरून प्राप्त मोबाईल नंबर, पत्ते हे बनावट आढळले. त्यामुळे काही विशिष्ट मोबाईलधारकांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले. यात दिल्लीतील एका मोबाईलधारकाची माहिती प्राप्त झाली. त्यावेळी नामचीन टोळी देशातील कुठल्याही बँकेतील अकाउंट हॅक करीत असल्याचा संशय बळावला. संशयितांच्या अटकेसाठी रवाना झालेल्या `एलसीबी` पथकाने १९ ऑक्टोबरला तिलकनगर (दिल्ली) येथून नितिका दीपक चित्रा (वय ३०, रा. जुने महावीरनगर) हिची चौकशी केली. तिच्या व रमनकुमारच्या घर झडतीत नऊ मोबाईल, दोन नोटा मोजण्याचे मशीन, आयपॅड, डिजिटल लॉकर, अॅपल घड्याळ, संगणक संच, कलर प्रिंटर, दोन राऊटर, विविध बँकांचे एटीएम कार्ड, पासबुक, चेकबुक आधारकार्ड, वेगवेगळ्या कंपन्यांचे सिमकार्ड, असा एकूण पाच लाख १८ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. 

पाच जण पोलीस कोठडीत 
`एलसीबी` पथकाने संशयित नितीकाला येथे आणत अटक केली. तिला जिल्हा न्यायालयाने मंगळवारपर्यंत (ता. २७) पोलीस कोठडी सुनावली. तसेच अटकेतील नवी दिल्लीतील दीपक राजकुमार चित्रा (वय २९, रा. जुने महावीरनगर), रमनकुमार दर्शनकुमार (३०, रा. तिलकनगर), अवतारसिंग ऊर्फ हॅपी वरेआमसिंग (२८, रा. तिलकनगर) टोबॅचिकू जोसेफ ओकोरो ऊर्फ प्रेस (२३, रा. अंसल हाउसिंग ग्रेट नोएडा) यांना न्यायालयाने ३ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, निरीक्षक शिवाजी बुधवंत, सायबर तज्ज्ञ गुजराथी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत पाटील, उमेश बोरसे, हनुमान उगले, सारिका कोडापे, हवालदार संजय पाटील, रवी माळी, पोलीस नाईक संदीप पाटील, अशोक पाटील, श्रीशेल जाधव, सुनील पाटील, मनोज महाजन, मनोज बागुल, विशाल पाटील, उमेश पाटील, रेणुका भानगुडे आदींनी कारवाई केली.