ओल्‍या कापसाचे दर निम्‍म्‍यावर; अतिपावसाचा फटका

जगन्‍नाथ पाटील
Tuesday, 22 September 2020


एकवेळ होती की कापसाची वेचणी करून घरी आणल्‍यानंतर त्‍यावर पाणी मारून घरात ठेवले जायचे. जेणेकरून कापसाचे वजन जास्‍त भरेल आणि फायदा होईल. व्यापारी देखील कापूस खरेदी करताना गाडीत पाणी मारून भरत असे. पण आता परिस्‍थिती उलटी झाली असून, अतिपावसामुळे वेचणीवर आलेला कापूस ओला होत आहे. हा कापूस उन्हात टाकून सुकविला जात असला; तरी देखील व्यापारी आता अशा कापसाला निम्‍मे दरात खरेदी करत आहे.

कापडणे (धुळे) : गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. बागायती कापसाची वेचणी सुरू झाली आहे. पावसामुळे कापूस ओला आणि खराब अवस्थेत निघत आहे. कापूस वेचणीनंतर शेतकऱ्यांना कोरडा करण्यासाठी गल्लीबोळात वाळवण्यासाठी टाकावा लागतोय. वेचणीसह वाळवण्याला टाकण्यासाठी मजुरी लागत आहे. ओला, खराब आणि चांगल्यास्थितीला कापूस केवळ प्रतिक्विंटल दोन हजार पाचशे रुपयांप्रमाणे व्यापारी खरेदी करू लागले आहेत. आर्थिक अडचणींमुळेही शेतकऱ्यांनी कमी भाव असताना कापूस विक्री सुरू केली आहे. 

‘जगावं की मरावं’ हाच प्रश्न 
नामवंत इंग्रजी नाटककार शेक्सपिअरने ‘टू बी ऑर नॉट टू बी’ अर्थात जगावे की मरावे असे म्हणून ठेवले आहे. अशीच स्थिती पुन्हा शेतकऱ्यावर वारंवार येऊन ठेपत आहे. यावर्षी पुरेसा पाऊस आणि दमदार पिकांमुळे मोठ्या प्रमाणात पिकेल, असे शेतकऱ्यांना वाटू लागले होते. मात्र पिकांचे अधिकच्या पावसाने अधिकच नुकसान होत आहे. शेतीमालाला भावच नाही. मातीमोल भावामुळे शेतकऱ्यांची मेहनत मातीमोल ठरत आहे. दुष्काळ असो की भरमसाठ पाऊस तरीही शेतीमालाला भावच नाही. शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे नुकसान तर पाचवीलाच पुजलेले आहे. अशा स्थितीत जीवनयात्रा संपवणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढतीच आहे. 

मूग, चवळी, उडिदाची टरफले वेचायची का? 
दमदार पावसामुळे मूग, चवळी आणि उडिदाची पिके मोठ्या प्रमाणात तरारली होती. विक्रमी उत्पादन हाती येईल, म्हणून शेतकरी समाधान व्यक्त करीत होते. मात्र शेंगा तोडण्याच्या हंगामात सातत्यपूर्ण पाऊस सुरू होता. शेंगा सडून नुकसान झाले. तर पिकांमध्ये उंदरावनची संख्या वाढली. उंदरांनीच शेंगांचा हंगाम फस्त केला. शेतात टरफले पसरलेली आहेत. ही टरफले वेचायची का असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला. जळगाव व नाशिकमध्ये या नुकसानीचे पंचनामे झालेत. पण धुळे जिल्ह्यात सत्ताधारी शिवसेनेने मागणी करुनही पंचनामे झाले नाहीत. ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. कडधान्याला बाजारात दोन हजारपासून पाच हजारापर्यंतचा भाव आहे. सध्या बाजरी व मका काढणीला आलेल्या आहे. पाऊस सुरू असल्याने ही कामे खोळंबली आहेत. नुकसान होत आहे. 
 
सुरुवातीपासून दमदार पाऊस होत आहे. नुकसानीमुळे अधिक पिकेल ही आशा फोल ठरली आहे. ओला दुष्काळ सदृश स्थिती निर्माण झाली आहे. 
- युवराज पाटील, शेतकरी, नगाव (ता. धुळे) 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule heavy rain cotton deep and low rate