धुळे जिल्ह्यातील बेहेड गावात अतिवृष्टी; लाखोंचे नुकसान

बालकृष्ण तोरवणे
Monday, 14 September 2020

तीन तास मुसळधार झालेल्या पावसाने सर्वच नाले दुथडी भरून पुराने वाहत होते. पावसाने शेती जलमय करून टाकली. वादळ नसल्यामुळे उशिरा पेरणी झालेली पिके वाचली. 

 कासारे  ः बेहेड (ता. साक्री) येथील शेतशिवारात रविवारी (१३ सप्टेंबर) तब्बल अडीच तास कोसळलेल्या ढगफुटी व अतिवृष्टीमुळे शेतातील बाजरी, मका, तूर, कपाशी, सोयाबीन, ऊस, भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. 

दुपारी दोन ते सायंकाळी पाचदरम्यान तीन तास ढगफुटीचा विक्रमी पाऊस पडला. त्यात तोंडाशी आलेला घास आस्मानी संकटाने हिरावून नेल्याचा बाका प्रसंग बेहेडसह विटाई, नाडसे, दारखेल, निळगव्हाण, छाईल, प्रतापपूर, दिघावेच्या ग्रामस्थांवर आला आहे. 

लाखोंचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज 
या पावसामुळे लाखोंचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, सोमवारी (१४ सप्टेंबर) महसूल विभागाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी करून पंचनामा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. आधीच अतिवृष्टीमुळे शेती जलमय झाली होती, त्यात पुन्हा आजच्या पावसाने शेती जलमय करून टाकली. वादळ नसल्यामुळे उशिरा पेरणी झालेली पिके वाचली. 

नाल्यांनी रस्ते अडविले 
तीन तास मुसळधार झालेल्या पावसाने सर्वच नाले दुथडी भरून पुराने वाहत होते. तीन ते चार तास शेतशिवारात व अन्य ठिकाणी गेलेले ग्रामस्थ नाल्यांना पाणी असल्यामुळे अडकून पडले. बेहेड ते नांदवनदरम्यानच्या नाल्याला फरशीवरून पाणी असल्यामुळे दोन्ही बाजूंची रहदारी अनेक तास खोळंबून होती. साक्री ते काटवानला जोडणारा हा रस्ता असल्याने मोठी वर्दळ असते. सर्व शेतकरी वर्गाच्या शेतातील बाजरी पक्की झाल्यामुळे कापली गेली आहे. काही कापणीवर येऊन गेली आहे. बहुतांश बाजरी पिके पाण्यात तरंगत असून, पिके हातातून गेल्यात जमा आहेत. 
 

धुळे, नेर

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule Heavy rains in Behed village caused severe damage to agriculture in the area