विचित्र अपघातात तीन जण ठार; पाच मजूर जखमी

सकाळ वृत्तसेवा
Friday, 8 May 2020

नरडाणा शिवारात जयगुरूदेव घड्याळ दुकानासमोर धुळे- शिरपूर मार्गालगत आयशर (एमएच18/एए8117) लावला होता. धुळ्याकडून शिरपूरकडे काल (ता.7) दुपारी दीडच्या सुमारास बोलेरो पिकअप व्हॅन वेगात जात असताना चालकाने आयशरला खेटून व्हॅन पुढे नेण्याचा प्रयत्न केला.

धुळे : मुंबई-आग्रा महामार्गावरील नरडाणा (ता. शिंदखेडा) शिवारात विचित्र अपघातात आयशरचा हूक अडकल्याने बोलेरो व्हॅनमधील तीन जण ठार, पाच जण जखमी झाले. नरडाणा पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल झाला. 

नरडाणा शिवारात जयगुरूदेव घड्याळ दुकानासमोर धुळे- शिरपूर मार्गालगत आयशर (एमएच18/एए8117) लावला होता. धुळ्याकडून शिरपूरकडे काल (ता.7) दुपारी दीडच्या सुमारास बोलेरो पिकअप व्हॅन वेगात जात असताना चालकाने आयशरला खेटून व्हॅन पुढे नेण्याचा प्रयत्न केला. आयशरजवळून व्हॅन नेताना आयशरच्या बॉडीचा मागील हूक व्हॅनमध्ये अडकला. त्यामुळे व्हॅनच्या बॉडीचा पत्रा कापला गेला, त्यात व्हॅनमधील प्रवाशांनाही गंभीर दुखापत झाली. त्यात कृष्णानंद गोवर्धन (वय 61, बसंतपुरा, राजा गवडा, उत्तर प्रदेश), साकीर अली नवाब अली (34, रा. रामटेकिया, जि. खापुरवा, उत्तर प्रदेश), अज्जान अब्बास अली (35, रा.धांबीरपूर्वा, यादवपूर मेहटिया, ता. केशरगंज, उत्तर प्रदेश) गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. अपघातात पिकअपमधील आशिष पुलचंद कश्‍यप, पुलचंद त्रिलोकी कश्‍यप (रा. सीताव्दार, जि. साराबत्ती), छोटू कबू महिरोद्दिन (40, रा. बेलकर, ता. इकवना, जि. साराबत्ती), डल्लू अरमान (54, रा.हरवातांड, जि. बहराईच), शकील हनीप अन्सारी (रा.हरवातांड, कांजीया, जि. बहराईच) जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल केले असून, उपचार सुरू आहेत. युनूस अब्दुल अजीज अन्सारी (रा.हरवाकाळ, ता. केसरगंज) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जयेश नंद ठाकूर (रा. क्रांतीनगर, शिरपूर), जावेद बकरिदी खान (रा. भिवंडी, ठाणे) यांच्याविरुद्ध नरडाणा पोलिस ठाण्यात अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. पोलिस उपनिरीक्षक ए. के. पाटील तपास करीत आहेत. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच नरडाणा पोलिसांसह ग्रामस्थ, व्यावसायिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातात बोलेरोचे नुकसान झाले. जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले, अपघातानंतर काही काळ वाहतूक खोळंबली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule highway accident three death