esakal | रोज चारशे जम्बो ऑक्सिजन सिलिंडरचा वापर 
sakal

बोलून बातमी शोधा

रोज चारशे जम्बो ऑक्सिजन सिलिंडरचा वापर 

जिल्ह्यात एप्रिलपासून रुग्ण आढळण्यास सुरवात झाली. नंतर प्रमाण वाढत गेले. त्यामुळे रुग्णांना ऑक्सिजनची गरज वाढत गेली. हिरे महाविद्यालयाने आयसीयूमधील ३५ खाटांसह इतर एकूण १२५ खाटांना सेंट्रल ऑक्सिजनची सुविधा निर्माण केली आहे.

रोज चारशे जम्बो ऑक्सिजन सिलिंडरचा वापर 

sakal_logo
By
निखील सुर्यवंशी

धुळे ः हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे रोज चारशे जम्बो ऑक्सिजन सिलिंडरची गरज भासते आहे. चार महिन्यांत आतापर्यंत दहा हजारांहून अधिक सिलिंडरचा वापर झाला आहे. या स्थितीमुळे रुग्णालयाचा कार्यभार वाढला असून, ऑक्सिजन सिलिंडरच्या सेवेसाठी मनुष्यबळाचे नियोजन करताना व्यवस्थापनाची कसरत होत आहे. 

जिल्ह्यात गुरुवारी (ता. ६) रात्री साडेदहापर्यंत कोरोनाग्रस्तांची एकूण रुग्णसंख्या तीन हजार ९०७ वर पोचली होती. पैकी एक हजार १०८ रुग्ण उपचार घेत होते, तर दोन हजार ६६५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. उपचार घेणाऱ्यांमध्ये ६२ गंभीर रुग्ण आहेत. तसेच २३२ रुग्णांची प्रकृती थोडी अस्वस्थ होती. यात ४५३ रुग्णांचे नमुने तपासणी अहवाल प्रलंबित होते. महापालिका क्षेत्रात आतापर्यंत दोन हजार ६५ कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यात सद्यःस्थितीत ५७० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एक हजार ४२८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. उर्वरित जिल्ह्यात आढळलेल्या एक हजार ८४२ पैकी सध्या ५३८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एक हजार २३७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 
 

सिलिंडरची वाढती गरज 
जिल्ह्यात एप्रिलपासून रुग्ण आढळण्यास सुरवात झाली. नंतर प्रमाण वाढत गेले. त्यामुळे रुग्णांना ऑक्सिजनची गरज वाढत गेली. हिरे महाविद्यालयाने आयसीयूमधील ३५ खाटांसह इतर एकूण १२५ खाटांना सेंट्रल ऑक्सिजनची सुविधा निर्माण केली आहे. यात सध्या १० ते १२ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांना अधिक प्रमाणात ऑक्सिजन लागतो आहे. सर्वोपचार रुग्णालयात चार-चारच्या समूहाने प्रत्येकी आठ जम्बो ऑक्सिजन सिलिंडर लावली जातात. त्यासाठी ‘चेंजर’ कर्मचारी नियुक्त आहे. पूर्वी एक जम्बो सिलिंडर दिवसभर पुरायचे. आता चार-चारच्या समूहाची सिलिंडर काही मिनिटांत संपतात. ती सरासरी दर अर्ध्या तासाने बदलावी लागतात. सिलिंडर संपायला आला की अलार्म वाजतो, त्याप्रमाणे चेंजर कर्मचारी सिलिंडर बदलण्याचे काम करतात. रुग्णांना वाढती ऑक्सिजनची गरज आणि या आनुषंगिक कार्यभार वाढल्याने हिरे महाविद्यालय, जिल्हा रुग्णालयाची कसरत होत आहे. आहे त्या मनुष्यबळात या कार्यभाराचे नियोजन करावे लागत आहे. परिणामी, थोडे स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत आहे. रुग्णांची प्रकृती सुधारण्यावर अधिक लक्ष केंद्रित केल्याचे रुग्णालय व्यवस्थापनाने सांगितले. 

ऑक्सिजनचा असा होतो वापर... 
जम्बो ऑक्सिजन सिलिंडर सात हजार लिटरचे असते. ते सध्या पाच मिनिटांत संपते आहे. दहा लिटर परमिनिट याप्रमाणे ऑक्सिजनचा वापर होत आहे. म्हणजेच एक मिनिटात दहा लिटर ऑक्सिजन संपतो आहे. अशा चार जम्बो ऑक्सिजनचा समूह (लॉट) सरासरी २० मिनिटांत संपतो. या स्थितीवर नियंत्रणासाठी कर्मचारी नियुक्त आहे. वरिष्ठांची देखरेख असते. बेड साइड ऑक्सिजन सिलिंडर बदलासाठीही कर्मचारी नियुक्त आहेत. त्यामुळे सर्व प्रकारची रोज सरासरी चारशे ऑक्सिजन सिलिंडर लागत असल्याचे व्यवस्थापनाने सांगितले. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे
 

loading image