
एम.डी. पदवी घेवून बदलापूर येथे प्रॅक्टिस सुरू केली होती. आपल्याच शिक्षणाप्रमाणे म्हणजे बीएएमएस झालेल्या जोडीदाराशी विवाह केला. तरी देखील पत्नीला दवाखान्यात प्रॅक्टिस करण्यासाठी जावू न देणे; शिवाय मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करण्यासाठी पैसे हवेत म्हणून पत्नीच्या मागे तगादा लावला. उच्चशिक्षीत डॉक्टर असून देखील कोणताही विचार न करता पत्नी मृणालिनी हिला गळफास देवून मारण्याचा प्रकार घडला.
कापडणे (धुळे) : हातेड येथील डॉ. हेमंत सोनवणे याने पत्नी डॉ. मृणाली सोनवणे (वय३०) यांचा मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलसाठी माहेरुन पैसे आणण्यासाठी आणि वैवाहिक जिवनाच्या तीन वर्षांत चारचाकी गाडी व फ्लॅटसाठी सातत्याने छळ केला. हॉस्पिटलसाठी पैसे आणले नाहीत म्हणून डॉ. सोनवणे याने बदलापूर येथे गळफास देत निघृण हत्या केली. या घटनेने विखरणसह (ता. शिंदखेडा) परीसरातून संताप व्यक्त केला जात आहे.
समाज मनाला सुन्न करणाऱ्या या घटनेचा गुन्हा बदलापूर (ठाणे) पश्चिम पोलिस ठाण्यात २९ जुलैला नोंद झाली आहे. पोलिसांनी डॉ. हेमंत प्रताप सोनवणेला अटक केली आहे. सासरे प्रताप तुळशिराम सोनवणे (हातेड), नणंद राजश्री भूषण बाविस्कर (हातेड), नंदोई भूषण नरेंद्र बाविस्कर (हातेड) आणि नणंद ज्योती प्रताप सोनवणे (हातेड) यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत.
हुंड्यासाडी पत्नीचा छळ
हातेड (ता. चोपडा) डॉ. हेमंत सोनवणे याने एम.डी. पदवी घेत बदलापूर येथे प्रॅक्टीस सुरु केली होती. जानेवारी २०१६ मध्ये विखरण (ता. शिंदखेडा) येथील व बोईसर येथे स्थायिक झालेले संभाजी दयाराम साळुंके यांची कन्या डॉ. मृणाली हिच्याशी विवाह झाला. विवाहात बावीस तोळे सोने देवूनही काही महिन्यातच हुंड्यासाठी छळ सुरु केला. हातेड येथील घर बांधण्यासाठी लाखभर रक्कम, स्वतंत्र दवाखाना बांधकामासाठी पैशांची मागणी, चार चाकी वाहन व कमर्शिअल फ्लॅटसाठी पैश्यांची मागणी, मित्रांसोबत मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये सहभागी होण्यासाठी चार करोडची मागणी करून छळ सुरुच होता.
डॉक्टर असून प्रॅक्टीसला मनाई
हेमंत सोनवणे याने पत्नी मृणाली ही बीएएमएस असूनही तिला प्रॅक्टीस करण्यास परवानगी दिली नाही. दवाखान्यातही येवू दिले नाही. ही मोठी विकृती असल्याचे संभाजी साळुंके यांनी सांगितले. डॉ. मृणाली यांच्या शारिरीक व्यंगावर पती, सासरेकडील मंडळी नेहमीच टोमणे मारायचे.
फाशीच झाली पाहिजे
माझी मुलगी डॉ. मृणालिनीला गळफास देवून ठार केले आहे. हेमंत सोनवणे यानेच सराईतपणे खून केला आहे. माझ्या मुलीला तात्काळ न्याय मिळावा. डॉक्टरसह त्याचे वडिल व बहिणींचा समाजाने निषेध करावा. उच्च शिक्षितांकडून डॉ. मृणाली हुंडाबळीची शिकार झाली. ही शोकांतिका असल्याचे मृणालीनीचे वडील संभाजी सांळुके यांनी म्हटले आहे.
संपादन : राजेश सोनवणे