पाळीव जनावरांनाही ‘आधार’ची ओळख

सागर साळुंके
Tuesday, 3 November 2020

आधार कार्डवर नोंदणी एका विशेष प्रणालीवर केली जात असून जनावरांची परिपूर्ण माहिती ऑनलाइन उपलब्ध होणार आहे.

शेवाळी (धुळे) : साक्री तालुक्यात शेतकऱ्यांचे साथीदार पाळीव जनावरांनाही बारा अंकी आधार क्रमांक देण्यात येत आहे. यामुळे जनावरांची माहिती एका क्लिकवरती उपलब्ध होणार आहे. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय पशु रोग नियंत्रण कार्यक्रमा अंतर्गत साक्री तालुक्यात देखील या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे.
केंद्र शासनाने आता पाळीव जनावरांनाही आधार क्रमांक देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय पशु रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत गाय, म्हैस, बैल या जनावरांना स्वतःची ओळख मिळवून देण्यासाठी बारा अंकी आधार क्रमांक देण्यात येत आहे. यामुळे जनावरांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. शिवाय या उपक्रमांतर्गत साक्री तालुक्यातील गाय, म्हैस, बैल या जनावरांना लाळ खुरकूत रोग प्रतिबंधक लसीकरण व कानाला बिल्ले मारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. आधार कार्डवर नोंदणी एका विशेष प्रणालीवर केली जात असून जनावरांची परिपूर्ण माहिती ऑनलाइन उपलब्ध होणार आहे. यावेळी उपस्थित डॉ. श्याम कोळेकर सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, डॉ. यशवंत बहिरम पशुसंवर्धन विकास अधिकारी बळसाने, श्री निलेश भामरे, श्री ललित अहिराव, श्री टिकाराम भोये आदी उपस्थित होते.

तर खरेदी- विक्रीवरती मर्यादा
पाळीव प्राण्यांच्या कानात बिल्ला नसल्यास यापुढे त्यांची खरेदी- विक्री करता येणार नाही. नैसर्गिक आपत्ती विजेच्या धक्क्याने किंवा वन्यप्राण्यांच्या हल्ल्याने जनावर दगावल्यास शासनाची भरपाई मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. शिवाय कोणत्याही बँकेत जनावरांवर कर्ज घेतल्यास विमा रक्कम मिळवण्यासाठी बिल्ला नंबर आवश्यक करण्यात आला आहे. यासाठी सर्व जनावरांची ऑनलाईन नोंदणी केली जात आहे.

साक्री तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखाने अंतर्गत लाळ खुरकूत लसीकरणा सोबतच जनावरांना हे बिल्ले मारण्याचे काम सुरू आहे. यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचारी तालुक्यात कार्यरत आहेत या पुढील शासनाच्या विविध योजना व जनावरांच्या आजाराबाबत या उपक्रमाची गरज भासणार असल्याने पशुपालक शेतकऱ्यांनी आपल्याकडे जनावरांना लाळ खुरकूत लस, बिल्ले मारण्यासाठी जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क करावा,
- डॉ. श्याम कोळेकर, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन विभाग साक्री.

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule Identification of aadhaar for animal