रोहयो, फलोत्‍पादन योजनेत केळी, पपईचा समावेश करा ! 

सचिन पाटील 
Thursday, 29 October 2020

खानदेशातील केळी व पपईचे लागवडक्षेत्र, फळपीक योजनेत ही दोन्ही पिके अंतर्भूत करण्याची निकड आदींबाबत माहिती दिली. स्वतःसह माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांचे पत्रही त्यांनी मंत्र्यांना दिले.

शिरपूर : पंतप्रधान फळ पीकविमा योजनेंतर्गत केळी व पपई पिकांचा रोजगार हमी योजना व फलोत्पादन योजनेत समावेश करावा, अशा मागणी येथील आमदार काशीराम पावरा यांनी राज्याचे रोहयो व फलोत्पादनमंत्री संदीपान भुमरे यांच्याकडे केली.

आमदार पावरा यांनी विहामांडवा (ता. पैठण) येथील रेणुका शरद सहकारी साखर कारखान्याच्या साइटवर मंत्री भुमरे यांची भेट घेतली. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष के. डी. पाटील, शिरपूर साखर कारखान्याचे संचालक भरत पाटील, बाजार समितीचे संचालक ॲड. प्रताप पाटील उपस्थित होते. 

आमदार पावरा यांनी मंत्री भुमरे यांच्याशी चर्चा करताना खानदेशातील केळी व पपईचे लागवडक्षेत्र, फळपीक योजनेत ही दोन्ही पिके अंतर्भूत करण्याची निकड आदींबाबत माहिती दिली. स्वतःसह माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांचे पत्रही त्यांनी मंत्र्यांना दिले. राज्यात इतर फळ पिकांसाठी अनुदान देय आहे.  रोपवाटिकेतून  केळी व पपईचे रोप जादा किमतीने मिळत असल्याने शेतकऱ्यांसाठी तो खर्च न पेलवणारा आहे. इतर फळ पिकांसंदर्भात शासन निर्णयाच्या निकषाप्रमाणेच केळी व पपई पिकांचाही समावेश व्हावा. शिरपूर तालुक्यात आदिवासी भाग मोठ्या प्रमाणात असल्याने आदिवासी बांधवांना मिळालेल्या वनपट्टे जमिनीचाही रोजगार हमी योजनेत समावेश करावा. अल्पभूधारक, तसेच मोठ्या शेतकऱ्यांनाही शासनाच्या योजनेचा लाभ मिळावा, अशी मागणी पत्रात केली आहे. मंत्री भुमरे यांनी भ्रमणध्वनीवरून अमरिशभाई पटेल यांच्याशी चर्चा केली.  

 

संपादन- भूषण श्रीखंडे

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule include banana, papaya in horticulture scheme mla padvi demand by minister