esakal | लॉकडाउनचा परिणाम : ऑनलाइन शिक्षणामुळे डोळ्यांच्या रुग्णांत वाढ 
sakal

बोलून बातमी शोधा

लॉकडाउनचा परिणाम : ऑनलाइन शिक्षणामुळे डोळ्यांच्या रुग्णांत वाढ 

अनेक पालकांना वाटते. त्यामुळे अनेक ऑनलाइन खासगी क्लासेस सुरू झाले आहेत. त्याचे काही दुष्परिणामही समोर येत आहेत. 

लॉकडाउनचा परिणाम : ऑनलाइन शिक्षणामुळे डोळ्यांच्या रुग्णांत वाढ 

sakal_logo
By
निखिल सूर्यवंशी

धुळे : कोरोनामुळे सध्या शैक्षणिक संस्था बंद आहेत. स्पर्धेत टिकण्यासाठी अनेक संस्थांनी ऑनलाइन शिक्षणावर भर दिला आहे. त्यामुळे शिक्षक, विद्यार्थी ‘टेक्नोसॅव्ही’ झाले. मात्र, त्यातील काही दुष्परिणाम पुढे येत आहेत. सतत मोबाईल, संगणक, लॅपटॉपच्या हाताळणीमुळे विद्यार्थ्यांचे डोळ्यांचे आजार बळावत आहेत. यामुळे अनेक पालक चिंतेत आहेत. लॉकडाउनच्या तीन महिन्यांत विद्यार्थी रुग्णसंख्या वाढल्याचे नेत्रतज्ज्ञांनी सांगितले. 

काही इंग्रजी माध्यम व उपक्रमशील शाळांमध्ये पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचे आठवड्यातून दोन वेळा, तर पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे रोज ऑनलाइन वर्ग भरत आहेत. विद्यार्थी गैरहजर असला तर पालकांना माहिती दिली जाते. मोबाईल रेंजचा प्रश्‍न सतावतो. त्या विद्यार्थ्यांना अर्धा तासाची शिकविल्या जाणाऱ्या धड्याची व्हिडिओ क्लीप (ऑफलाइन वर्क) पाठविली जाते. नंतर विद्यार्थ्यांच्या शंकांचे ऑनलाइन निरसन केले जाते. 

काही इंग्रजी माध्यमाच्या पाचवी ते दहावीच्या शाळांची तिमाही परीक्षा आणि निकालही जाहीर झाला. पाल्याने रिकामे राहू नये, त्याने अभ्यासात गुंतून राहावे, असे अनेक पालकांना वाटते. त्यामुळे अनेक ऑनलाइन खासगी क्लासेस सुरू झाले आहेत. त्याचे काही दुष्परिणामही समोर येत आहेत. 

हे आहेत दुष्परिणाम... 
-डोळे मिचकवण्याचे प्रमाण कमी 
-डोळ्यांतील पाण्याचे प्रमाण घटणे 
-लाली येणे, डोळे चुळचुळ करणे 
-डोळे लहान करून टीव्ही पाहण्यात वाढ 
-झोपूनच टीव्ही पाहणे, मोबाईल हाताळणे 
-मोबाईलच्या रेंजमुळे डोळ्यांवर परिणाम 
-दूरचे कमी दिसण्याचे वाढते प्रकार 
-डोळ्याखाली काळे वर्तुळ वाढणे 
-मुलांमध्येही चष्म्याचे वाढते नंबर 
-प्रथम डोळे, नंतर डोकेदुखीचा त्रास 
-हृदयविकार जडण्याची शक्यता 

हे आहेत उपाय... 
-डोळ्यांनाही आराम देण्याची सवय करावी 
-रात्री अवकाशातील तारे, चांदण्यांकडे पाहणे 
-ॲन्टी- ग्लेअर कोटींग चष्म्याचा वापर करावा 
-नंबर नसला तरी ॲन्टी- ग्लेअर चष्मा वापरावा 
-ब्लू लाइट फिल्टरचा ॲन्टी ग्लेअर चष्मा योग्य 
लहान स्क्रीनऐवजी मोठ्या स्क्रीनचा वापर करावा 
-सर्वांनी ‘अ’ जीवनसत्त्व वाढीसाठी प्रयत्न करावे 
-मध, तेल, तूप वैगरे परस्पर डोळ्यात टाकू नये 
-पालक, विद्यार्थ्यांच्या शंका निरसनासाठी तज्ज्ञ बोलवावे 

काळजी घेतली तर डोळे सहीसलामत 
विद्यार्थ्यांना दूरचे दिसणे कमी होत असून, चष्म्याचा नंबर वाढत आहे. डोळे मिचकवण्याचे प्रमाण कमी. त्यामुळे डोळ्यातील पाणी घटून अश्रूचे प्रमाण कमी. परिणामी, चष्मा लागण्याचे प्रमाण वाढत आहे. शिवाय विविध व्याधी बळावतात. चंद्र, तारे, पक्षी पाहणे, मैदानी खेळ बंद झाले असून, मोबाईलवर खेळण्यात मुले-मुली गुंग राहतात. वेळीच खबरदारी घेऊन उपाय केले, तर डोळे सहीसलामत राहू शकतील. 
-मुकर्रम खान, नेत्रतज्ज्ञ 

सर्व वयोगटाला ‘कॉम्प्युटर व्हीजन सिंड्रोम’चा त्रास जाणवतो. आपण टीव्ही, मोबाईल, कॉम्प्युटर, लॅपटॉप टवकारून पाहतो. त्यामुळे डोळे मिचकवण्याचे प्रमाण कमी होते. डोळ्यांना कोरडेपणा येतो. मग डोळ्याच्या व्याधी बळावतात. त्यामुळे प्रत्येकाने ‘रूल ऑफ ट्वेंटी’ची सवय लावावी. त्यानुसार दर २० मिनिटांनी २० सेकंद डोळ्यांना आराम द्यायचा. बुबूळ ‘क्लॉक व ॲन्टी क्लॉकवाईज’ फिरवायचे. हातांनी डोळे झाकून आराम द्यायचा. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आय ड्रॉप परस्पर वापरू नये. 
-ज्योती तिवारी, नेत्रतज्ज्ञ 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image