हॉस्पिटल्समधील बेडसह सुविधेची माहिती ‘ॲप'वर 

निखील सुर्यवंशी
Tuesday, 1 September 2020

प्रामुख्याने कोणत्या हॉस्पिटलमध्ये बेड शिल्लक आहेत याचीच माहिती नसल्याने शोधाशोध, विचारपूस करावी लागते. शिवाय ऑक्सिजनसह विविध सुविधा संबंधित ठिकाणी आहेत.

धुळे  ः कोरोना विषाणू संसर्गाचा धोका दिवसेंदिवस वाढत असताना सरकारी व खासगी दवाखान्यांमध्ये दाखल होताना कोरोनाबाधित रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांची ससेहोलपट होऊ नये यासाठी अपडेट माहिती सहजपणे उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने अद्यापही व्यवस्था झालेली नाही. दरम्यान, महापालिकेने यासाठी ॲप तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. येत्या दोन-तीन दिवसात ते तयार होऊन कार्यान्वित होईल असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. बाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढल्याचे चित्र आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढण्याची ही शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने सरकारी हॉस्पिटल्ससोबत खासगी हॉस्पीटल्समध्येही बेड आरक्षित केले आहेत. विविध ठिकाणी सध्या बाधित रुग्ण उपचारासाठी दाखलही होत आहेत. मात्र, खासगी दवाखान्यांमध्ये अवाजवी बिलांच्या तक्रारी होत असल्याने महापालिकेने भरारी पथके नियुक्त केले आहेत. ही पथके अशा तक्रारींचा निपटारा करतील, प्रसंगी कारवाईदेखील करतील. दरम्यान, अवाजवी बिलांच्या समस्येव्यतिरिक्त कोरोनाबाधित रुग्ण व नातेवाइकांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल होतांनाही काही अडचणींचा सामना करावा लागत आहे. यात प्रामुख्याने कोणत्या हॉस्पिटलमध्ये बेड शिल्लक आहेत याचीच माहिती नसल्याने शोधाशोध, विचारपूस करावी लागते. शिवाय ऑक्सिजनसह विविध सुविधा संबंधित ठिकाणी आहेत अथवा नाहीत याचीही माहिती नसल्याने अडचणी होतात. त्यामुळे गंभीर रुग्णांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हेलपाटे मारण्याची वेळ येते. 

पालकमंत्र्यांचीही होती सूचना 
दरम्यान, पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी २६ ऑगस्टला अवाजवी बिलांच्या तक्रारींची दखल घेऊन योग्य त्या कार्यवाहीसाठी पथके नियुक्तीसह रुग्णालयांमध्ये बेडसह सोयी-सुविधांची माहिती नागरिकांना व्हावी यासाठी ॲप कार्यान्वित करण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाला दिल्या होत्या. दरम्यान, पालकमंत्री श्री. सत्तार यांच्या निर्देशाप्रमाणे महापालिकेने ॲप तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली खरी पण अद्याप ते कार्यान्वित होऊ शकलेले नाही. 

दोन-तीन दिवसात शक्यता 
ॲप निर्मितीचे काम महापालिकेकडून सुरू असून येत्या दोन-तीन दिवसात ते पूर्ण होईल, कार्यान्वित होईल अशी अपेक्षा असल्याचे महापालिकेचे उपायुक्त शांताराम गोसावी यांनी ‘सकाळ'शी बोलताना सांगितले. ॲप निर्मिती ही तांत्रिक बाब असल्याने संबंधित यंत्रणेकडून ते कधी उपलब्ध होते यावरच सर्व अवलंबून आहे. मात्र, ॲप कार्यान्वित झाल्यानंतर नागरिकांना कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती बेड शिल्लक आहेत, कुठे ऑक्सिजनची व्यवस्था आहे आदी विविध माहिती या ॲपद्वारे घरबसल्या मिळणार आहे. त्यामुळे रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांचा त्रास वाचणार आहे. कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता येत्या काळात हे ॲप फायदेशीर ठरेल अशी अपेक्षा आहे. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule Information about all the facilities of the hospital bed sir regarding Corona will be available on the mobile app