राज्यात १,८९० शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या 

तुषार देवरे
Wednesday, 12 August 2020

सीईओ लॉगिनवर आउटगोइंग व इनकमिंग दोन्ही टॅब ॲक्टिव्ह करण्यात आले असून, आंतरजिल्हा बदलीच्या दोन्ही याद्या या टॅबवर उपलब्ध झाल्या आहेत.

देऊर : स्वजिल्ह्यात येण्यासाठी प्रतीक्षेत असलेल्या भूमिपुत्रांसाठी राज्यात चौथ्या टप्प्यातील जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेला सुरवात झाली आहे. यात राज्यातील ३४ जिल्ह्यांतील एक हजार ८९० प्राथमिक शिक्षकांचा समावेश आहे. राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या लॉगिनला सायकांळी पात्र याद्या ऑनलाइन पाठविण्यात आल्या. त्यानुसार कार्यवाही होणार आहे. या पार्श्वभूमीवर आंतरजिल्हा बदलीपात्र शिक्षकांसह कुटुंबात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

शिक्षकांचा जिव्हाळ्याचा आंतरजिल्हा बदली विषय आहे.  स्वजिल्ह्यात येण्यासाठी शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांबाबत लोकप्रतिनिधी, विविध शिक्षक संघटना शासनस्तरावर पाठपुरावा करत होत्या. त्यामुळे अनेक वर्षे रखडलेला बदल्यांचा प्रश्न मार्गी लागला आहे. मंगळवारी दिवसभरात प्रत्येक जिल्ह्यात आंतरजिल्हा बदली चर्चेचा विषय होता. आतापर्यंत तीन टप्प्यांत झालेल्या बदल्यांमध्ये दहा हजार ५०० शिक्षकांना आपल्या कुटुंबाजवळ जाता आले. पहिल्या टप्प्यात पाच हजार ५००, दुसऱ्या टप्प्यात तीन हजार ५००, तिसऱ्या टप्प्यात एक हजार ५०० बदल्या झाल्या आहेत. चौथ्या टप्प्यात राज्यभरातून जवळपास १२ हजार ७४० शिक्षकांनी आंतरजिल्हा बदल्यांसाठी अर्ज केले होते. पैकी एक हजार ८९० शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. सीईओ लॉगिनवर आउटगोइंग व इनकमिंग दोन्ही टॅब ॲक्टिव्ह करण्यात आले असून, आंतरजिल्हा बदलीच्या दोन्ही याद्या या टॅबवर उपलब्ध झाल्या आहेत. अद्यापही आठ हजार बदलीपात्र शिक्षक प्रतीक्षेत आहेत. 

कार्यमुक्ती ऑफलाइन 
आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांची कार्यमुक्ती कोरोना संकट नियंत्रणात आल्यानंतर केली जाणार आहे. ती ऑनलाइन पद्धतीने राहणार नाही. संबंधित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यमुक्ती देतील. २० टक्क्यांपेक्षा जास्त जागा रिक्त असल्यास नवीन शिक्षक आल्याशिवाय कार्यमुक्ती दिली जाणार नाही. 

जिल्‍हानिहाय आंतरजिल्हा बदली 
(आकडेवारी जिल्ह्याबाहेर गेलेले शिक्षक व स्वजिल्ह्यात आलेले शिक्षक, क्रमनिहाय) 
* नगर : ४६, ६५ * अकोला : २१, २८ * अमरावती : ३३, १९ *औरंगाबाद : ९७, ५३ * भंडारा : २६, ६७ * बीड : ५२, ४१ *बुलडाणा : ३८, ६५ * चंद्रपूर : २२, ९५ * धुळे : ४६, ७२ * गडचिरोली : ४९, ०८ *गोंदिया : २०, ३२ * हिंगोली : ३७, ९८ * जळगाव : ३१, ३० * जालना : ९१, ६८ * कोल्हापूर : ४९, ३२, * लातूर : ०५, ०५, * नागपूर : ११, ४४, * नांदेड : ३१, ८२, *नंदुरबार : ९९, १२५ * नाशिक : ८४, ८८ * उस्मानाबाद : २७, ३९ * पालघर : ११, २४ * परभणी : ४३, १२६ * पुणे : ४८, ६५ * रायगड : २४७, १८ * रत्नागिरी : ३२४, ०६ * सांगली : ७१, २८ * सातारा : ४०, १०९ * सिंधुदुर्ग : ०५, ०७ * सोलापूर : ३८, ९९ * ठाणे : ५५, ४७ * वर्धा : ०८, ३१, * वाशिम :०८, ०८ * यवतमाळ : ७७ , १६६. 

 

संपादन-भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule Inter-district transfers of one thousand eight hundred and ninety teachers in the state