esakal | दिवाळीत नागरिकांना बेघर करण्याचा डाव 
sakal

बोलून बातमी शोधा

citizens homeless

पखरुन पानखेडा ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत मल्याचापाडा हे गाव मानव केंद्रासमोर १९७०-७१ पासून वसलेले आहे. लाटीपाडा धरण बांधकाम सुरू असताना पाटबंधारे विभागाची कॉलनी होती.

दिवाळीत नागरिकांना बेघर करण्याचा डाव 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपळनेर (धुळे) : पिंपळनेरजवळील मानव केंद्राने मल्ल्याचापाडा गावात शंभर फूट अंतरापर्यंत जागा असल्याचे सांगून तार कंपाउंड केल्यामुळे संतप्त नागरिकांनी मानव केंद्राजवळील नवापूर रस्त्यावर गुरुवारी (ता. १२) रस्ता रोको केला. आम्ही धरण बांधण्याअगोदरपासून रहिवासी आहोत. महसूल विभागाशी हातमिळवणी करून मानव केंद्राचा गावात अतिक्रमण करून दिवाळीला नागरिकांना बेघर करण्याचा डाव असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. 
पखरुन पानखेडा ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत मल्याचापाडा हे गाव मानव केंद्रासमोर १९७०-७१ पासून वसलेले आहे. लाटीपाडा धरण बांधकाम सुरू असताना पाटबंधारे विभागाची कॉलनी होती. ती नंतर रूहानी मानव केंद्राने विकत घेतली. अलीकडे मानव केंद्र प्रबंधक कमिटीने तहसील व महसूल विभागाला हाताशी धरून उत्तरेकडील गावात १०० फुटापर्यंत जागा असल्याचे सांगून उतारा केल्याचे समजते. गुरूवारी अपर तहसीलदार यांच्या सोबत येऊन मल्याचापाडा अर्ध्या गावात तार कंपाउंड साठी थांबले यावेळी स्थानिक आदिवासी बांधवांनी अडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांना या महसूल विभागातर्फे दमदाटी करण्यात आली. 

नागरिकांमध्ये संताप 
दिवाळीच्या दोन दिवस अगोदर येथील रहिवाशांना बेघर करण्याचा डाव मानव केंद्राने केल्याने आरोप करीत नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली व महिला पुरुष पिंपळनेर नवापूर रस्त्यावर मानव केंद्र समोरच रस्ता रोको करत ठिय्या आंदोलन केले. यावेळी पिंपळनेर पोलिस ठाण्याचे एपीआय दिलीप खेडकर व त्यांचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले अप्पर तहसीलदार विनायक ही पोहोचले समजवण्याचा प्रयत्न केला असता संतप्त जमाव रस्त्यावरून हटायला तयार नव्हता. 

रास्‍ता रोको आंदोलन 
आधी हे तार कंपाउंड खांब काढा असा पवित्रा घेतला एक तास हे आंदोलन सुरू होते. यावेळी सरपंच छगन चौरे, माजी सरपंच रामदास गायकवाड, कार्यकर्ते प्रेमचंद सोनवणे यांनी गावाच्या हद्दीतील जागा बळकावण्याचा प्रकार केल्याचे सांगितले. गाडलेले खांब नागरिकांनी तोडून टाकले तसेच भ्रमणध्वनीवरून आमदार मंजुळाताई गावित यांच्याशी संपर्क करण्यात आला पत्रकारांनी मानव केंद्र समितीशी संवाद साधला असता कोणीही प्रतिक्रिया दिली नाही. आमचे वकील आहेत ते सांगतील असे सांगून निघून गेले. जर येथील नागरिकांना हटविण्याचा प्रकार झाल्यास प्रकरण चिघळण्याचे चित्र दिसत आहे.