आयर्लंडच्या फेसबुक अधिकाऱ्यांमूळे धुळ्याच्या तरुणाचे वाचले प्राण    

आयर्लंडच्या फेसबुक अधिकाऱ्यांमूळे धुळ्याच्या तरुणाचे वाचले प्राण    

धुळे : ‘फेसबुक लाइव्ह’द्वारे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या धुळे शहरातील तरुणाचा जीव आयर्लंड येथील फेसबुकच्या अधिकाऱ्यांनी वाचविला. यात फेसबुकच्या अधिकाऱ्यांकडून मुंबई पोलिस उपायुक्त रश्‍मी करंदीकर, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर, पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित यांना टप्प्याटप्प्याने तत्काळ निरोप आणि ‘अलर्ट' जिल्हा सायबर सेलसह देवपूर पोलिसांच्या तत्परतेमुळे ही कामगिरी यशस्वी झाली. संशयित जखमी तरुणाचे उपचारानंतर पोलिस अधीक्षकांनी समुपदेशन केले. 

एक तरुण ‘लाइव्ह' आत्महत्येच्या तयारीत असल्याचे आयर्लंड येथील फेसबुक अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता महाराष्ट्र शासनामार्फत पोलिसांशी संपर्क साधला. त्यामुळे तरुणाचा जीव वाचू शकला. त्याचे ज्ञानेश्‍वर पाटील- सूर्यवंशी (वय २३, रा. देवपूर) असे नाव आहे. नशेत व नैराश्यापोटी त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. 

गतीने संदेशवहन 
आयर्लंडमधील फेसबुकचे सतर्क अधिकारी आणि मुंबई सायबर सेल पोलिसांनी ही घटना समजल्यावर गतीने संदेशवहन केले. यात रविवारी (ता. ३) रात्री आठच्या सुमारास फेसबुक अधिकाऱ्यांनी दिलेल्या त्रोटक महितीआधारे सायबर पोलिसांनी काही मिनिटातच संबंधित तरुणाचे नाव, पत्ता आदी तपशील मिळविला. घटनास्थळी येथील देवपूरचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील व पथक दाखल झाल्यावर त्यांना ज्ञानेश्‍वर जखमी अवस्थेत दिसला. त्याने निवासस्थानी हा प्रकार केला. 

गतीने तपासचक्रे फिरली 
फेसबुकच्या अधिकाऱ्यांनी मुंबई पोलिस उपायुक्त रश्‍मी करंदीकर यांना माहिती दिल्यावर फेसबुक अकाउंटशी जोडलेले तीन मोबाईल क्रमांक तपासासाठी देण्यात आले. नंतर सायबर पोलिसांनी ज्ञानेश्‍वरशी संपर्काचा प्रयत्न केला. तेव्हा ते मोबाइल क्रमांक बंद होते. मुंबई पोलिसांनी ज्ञानेश्‍वरचा पत्ता मिळविला. तो धुळे शहरातील असल्याचे समजल्यावर त्यांनी श्री. दिघावकर, श्री. पंडित यांना माहिती दिली. नंतर गतीने तपास चक्रे फिरल्यावर देवपूर पोलिसांनी ज्ञानेश्वरचे घर गाठत तो ब्लेडच्या सहाय्याने गळा कापण्याच्या प्रयत्नात असताना त्याला रोखले. त्याला जखमी अवस्थेत हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. 

ज्ञानेश्‍वरने का केले असे? 
ज्ञानेश्‍वर पाटीलने आत्महत्येचा प्रयत्न का केला ते पोलिस अधीक्षक पंडित यांनी जाणून घेतले. त्याला कार्यालयात बोलावून श्री. पंडित यांनी समुपदेशन केले. मित्रमंडळींशी सततच्या होणाऱ्या भांडणास कंटाळून व व्यसनाधीन झाल्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे ज्ञानेश्‍वरने कबूल केले. चुकीची संगत आणि दिशा भरकटली, असेही त्याने मान्य केले. यापूर्वी त्याने तीन वेळेस असा प्रकार केला आहे. त्याची आई हातमजुरीनंतर होमगार्डची सेवा देते. पोलिस अधीक्षकांशी संवादानंतर त्याने आईच्या कष्टाची जाण ठेवून यापुढे आत्महत्येचा प्रयत्न करणार नाही, अशी ग्वाही दिली. देवपूरचे निरीक्षक चंद्रकांत पाटील उपस्थित होते.  

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com