शिक्षणाधिकारी- शिवसेनेत झुमकली...शैक्षणिक शुल्कप्रश्‍नी कार्यालयात जोरदार राडा 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 24 June 2020

शिक्षणाधिकाऱ्यांकडून तपासणी, संस्थांवर अंकुश आहे किंवा नाही, असे प्रश्‍न उपस्थित करत शिवसेनेचे शिष्टमंडळ सकाळी माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात गेले. 

धुळे : कोरोनाच्या महामारीत गरीब, सर्वसामान्य हवालदिल असताना पूर्ण वर्षाच्या शैक्षणिक शुल्काची मागणी करणे, देणग्यांसाठी आग्रह धरणे, पालकांचा दोन किंवा तीन टप्प्यांत शैक्षणिक शुल्क स्वीकारण्याबाबत प्रस्ताव धुडकावणाऱ्या काही शैक्षणिक संस्थांबाबत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात आज सकाळी गाऱ्हाणी मांडली. त्यावेळी तक्रारीवरून उद्‌भवलेल्या वादातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख शिक्षणाधिकाऱ्यांनी केल्याचे सांगत संतप्त शिवसेनेने जोरदार राडा केला. 

"कोरोना'मुळे 22 मार्चपासून आर्थिक उलाढाल ठप्प आहे. "लॉक डाउन', संचारबंदीमुळे असंख्य नागरिकांचा रोजगार, उत्पन्न, मिळकतीचे मार्ग बंद झाले. सद्यःस्थितीत "लॉक डाउन' शिथिल झाले तरी अनेक नियम लागू असल्याने अर्थचक्र रुळावर आलेले नाही. या स्थितीत शिक्षण संस्थांनी बांधिलकी, माणुसकी जोपासत शैक्षणिक शुल्क स्वीकारण्याबाबत काही धोरण आखण्याची गरज होती. शासनासह माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाने या संकटकाळात शैक्षणिक संस्थांना शैक्षणिक शुल्क, देणग्या घेण्याबाबत योग्य त्या सूचना देत काही गैरप्रकार आढळल्यास कारवाईचा पत्राद्वारे इशारा दिला. मात्र, या पत्राची खरोखर अंमलबजावणी होते का, केवळ सरकारी पद्धतीने पत्र देऊन प्रश्‍न सुटणार आहे का, याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांकडून तपासणी, संस्थांवर अंकुश आहे किंवा नाही, असे प्रश्‍न उपस्थित करत शिवसेनेचे शिष्टमंडळ सकाळी माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात गेले. 

तक्रारीबाबत उलट सुनावले 
कोरोनामुळे असंख्य पालकांची आर्थिक कोंडी झाल्याने त्यांच्या शैक्षणिक शुल्कप्रश्‍नी माध्यमिक शिक्षणाधिकारी आणि शिक्षण संस्थांनी संयुक्तपणे मार्ग काढणे आवश्‍यक आहे, अशी भूमिका शिष्टमंडळाने मांडली. त्यावर शिक्षणाधिकाऱ्यांनी दोन पत्रे दिली, असे सांगितले. त्यावर शिवसेनेचे समाधान झाले नाही. एका कार्यकर्त्याने शिक्षणाधिकारी काही करणार नसतील, तर त्यांची शिक्षणमंत्र्यांकडे तक्रार करावी लागेल, अशी भूमिका मांडली. यावर शिक्षणाधिकारी डॉ. सुभाष बोरसे यांनी शिक्षणमंत्रीच काय उद्धव ठाकरे यांच्याकडे माझी तक्रार करा, असे सुनावले. त्यामुळे शिवसेनेचे शिष्टमंडळ कमालीचे भडकले. 

झटापट, धक्काबुक्की 
महानगरप्रमुख नरेंद्र परदेशी, संजय गुजराथी, संघटक विजय भट्टड, माजी जिल्हाप्रमुख भूपेंद्र लहामगे, जिल्हा उपप्रमुख धीरज पाटील, संदीप सूर्यवंशी, कैलास मराठे, रामदास कानकाटे, पुरुषोत्तम जाधव यांच्यासह कार्यकर्ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केल्याने डॉ. बोरसे यांच्याकडे धावले. त्यांचा उद्धार करत, शिवीगाळ करत तीव्र संताप व्यक्त केला. शिक्षणाधिकारी आणि संतप्त कार्यकर्त्यांमध्ये झटापट, धक्काबुक्कीही झाली. धीरज पाटील यांनी डॉ. बोरसे यांच्याभोवती संरक्षक कडे केल्याने ते बचावले. तोवर संतप्त पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कार्यालयातील टेबलवरील कागदे, फाइल डॉ. बोरसे यांच्यावर भिरकावल्या. पंधरा मिनिटांनंतर कार्यालयातील तणाव निवळला. शिवसेनेच्या शिष्टमंडळाने डॉ. बोरसे यांच्या कार्यशैलीचा निषेध करत मागण्यांवर तत्काळ कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. 

शिक्षणाधिकाऱ्यांचा निषेध ः शाह 
शिक्षणाधिकारी डॉ. बोरसे यांच्यासारख्या जबाबदार अधिकाऱ्याने मुख्यमंत्री ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करणे निषेधार्ह आहे. शिवसेनेच्या सर्वोच्च नेत्याविरुद्ध कुणी एकेरी बोलत असेल तर पदाधिकारी, कार्यकर्त्यांना राग, संताप येणारच. शिक्षणाधिकाऱ्यांविरुद्ध कारवाईसाठी शासनाकडे मागणी करणार असल्याचे आमदार डॉ. फारुक शाह यांनी माध्यमांना सांगितले. 

डॉ. बोरसे "नॉट रिचेबल' 
घडलेल्या प्रकाराबाबत संपर्काचा प्रयत्न केला असता शिक्षणाधिकारी डॉ. बोरसे "नॉट रिचेबल' होते. काही वेळ त्यांनी मोबाईलला प्रतिसाद दिला नाही. त्यांनी घडलेला प्रकार वरिष्ठांच्या कानावर टाकला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पूर्वीपासून चाहता असून त्यांचा एकेरी उल्लेख केलेला नाही, अशी भूमिका डॉ. बोरसे यांनी त्यांच्या निकटवर्तीयांकडे व्यक्त केल्याचे सांगण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule The issue of tuition fees is raging in the office