esakal | धुळेकरांनो तुम्हीच तुमचा रस्ता व्यवस्थित दुरूस्त होत आहे का, नाही तपासा !
sakal

बोलून बातमी शोधा

धुळेकरांनो तुम्हीच तुमचा रस्ता व्यवस्थित दुरूस्त होत आहे का, नाही तपासा !

पावसाळ्यात घरापर्यंत जायलाही नागरिकांना मोठी कसरत करावी लागली. अनेक ठिकाणी माती पडून असल्याने अनेक नागरिकांच्या घरांच्या आजूबाजूला पाण्याचे डबके साचले.

धुळेकरांनो तुम्हीच तुमचा रस्ता व्यवस्थित दुरूस्त होत आहे का, नाही तपासा !

sakal_logo
By
निखील सुर्यवंशी

धुळे ः शहरातील भुयारी गटार (मलनिस्सारण योजना) योजनेच्या कामासाठी खोदलेले रस्ते पूर्ववत, वापरायोग्य करून देण्याचे काम ठेकेदाराचे आहे. मात्र, असे पूर्ववत रस्ते शहरात कुठे नजरेस पडत नाहीत. याबाबत महापालिकेचे अधिकारी, पदाधिकाऱ्यांनीही ठेकेदाराला वारंवार सूचना देऊनही हे काम निविदेतील अटी- शर्तीप्रमाणे होत नाही. हे काम योग्य पद्धतीने व्हावे, याची जबाबदारी ‘एमजेपी’ची आहे, मात्र, ‘एमजेपी’चेही या कामावर नियंत्रण नसल्याचे दिसते. त्यामुळे आता नागरिकांनीच आपापल्या भागातील रस्ते पूर्ववत होताहेत का, हे तपासण्याची वेळ आली आहे. 

देवपूर भागात १३१ कोटी खर्चाच्या भुयारी गटार योजनेचे काम सुरू आहे. या कामासाठी देवपूर भागातील जवळपास सर्वच मुख्य व अंतर्गत रस्ते खोदले आहेत. ते काम झाल्यानंतर लगेचच दुरुस्त न झाल्याने नागरिकांना कच्चे, चिखलमय रस्त्यांचाच वापर करावा लागत आहे. पावसाळ्यात घरापर्यंत जायलाही नागरिकांना मोठी कसरत करावी लागली. अनेक ठिकाणी माती पडून असल्याने अनेक नागरिकांच्या घरांच्या आजूबाजूला पाण्याचे डबके साचले. कंपाऊंडमध्ये पाणी शिरले. नागरिकांच्या तक्रारी नगरसेवकांनी महापालिकेच्या पदाधिकारी, अधिकाऱ्यांच्या कानावर घातल्या, स्थायी समितीत अनेकदा ही समस्या मांडली. त्यानंतर ‘एमजेपी’चे अधिकारी, योजनेच्या ठेकेदाराचे प्रतिनिधी, महापालिकेचे पदाधिकारी व अधिकारी आदींच्या बैठकाही झाल्या. त्यानंतर रस्ते दुरुस्तीचे काम सुरू झाले खरे, पण ही कामे पाहिजे तशी (निविदेतील अटी-शर्तीप्रमाणे) होत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 


रस्ता पूर्ववत होणे अपेक्षित 
जे रस्ते खोदले आहेत, ते योजनेच्या ठेकेदाराने पूर्ववत अर्थात खोदण्यापूर्वी जसे होते तसे, वापरायोग्य करून देणे अपेक्षित आहे. जेवढा रस्ता खोदला, तेवढा तो व्यवस्थित बुजविणे आवश्‍यक आहे. योजनेचे काम केल्यानंतर खोदलेल्या ठिकाणी मातीचे तीन- चार थर टाकून रिफिलींग व वॉटरींग, रोलिंगद्वारे कॉम्पॅक्शन, खडीकरणे, डांबरीकरण करणे आवश्यक आहे. रिफिलींगनंतर उरलेली माती व्यवस्थित उचलून दुसरीकडे सुचविलेल्या मोकळ्या जागेत टाकणेही अपेक्षित आहे. 


ठेकेदाराला १६ ते १७ वेळा स्मरणपत्र 
रस्ते दुरुस्तीच्या अनुषंगाने महापालिकेने भुयारी गटार योजनेच्या ठेकेदाराला १६ ते १७ स्मरणपत्र दिल्याचे अभियंता कैलास शिंदे यांनी सांगितले. महापौर चंद्रकांत सोनार, स्थायी समिती सभापती सुनील बैसाणे, आयुक्त अजीज शेख यांनीही वारंवार ठेकेदाराला सूचना दिल्याचे शिंदे म्हणाले. ठेकेदाराने खोदलेला रस्ता पूर्ववत, वापरायोग्य करून देणे आवश्‍यक असल्याचेही श्री. शिंदे यांनी सांगितले. 

loading image
go to top