पाणी झुळझूळ का वाहे...तर सिमेंटच पचविले 

अंबादास बेनुसकर
Tuesday, 14 July 2020

पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी साक्री पंचायत समितीचे माजी सदस्य प्रकाश अकलाडे यांनी जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा करून जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत हिंगोटी नाल्यावर बंधारा बांधून घेतला. गेल्यावर्षी चार लाख 88 हजार रुपये खर्चुन बंधारा बांधण्यात आला.

देशशिरवाडे (धुळे) : साक्री तालुक्‍यातील चिकसे, देगाव- गव्हाणीपाडा या गावाच्या वेशीवर असलेल्या हिंगोटी नाल्यावर जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत बंधारा बांधण्यात आला आहे. निकृष्ट कामामुळे बंधाऱ्यात पाणी साचत नसून बंधाऱ्याच्या भिंतीला पायापासून गळती लागली आहे. यामुळे बंधाऱ्यात पाणीसाठा होऊ शकत नसल्याने पावसाचे पाणी भिंती खालून वाहून जात आहे. 

पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी साक्री पंचायत समितीचे माजी सदस्य प्रकाश अकलाडे यांनी जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा करून जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत हिंगोटी नाल्यावर बंधारा बांधून घेतला. गेल्यावर्षी चार लाख 88 हजार रुपये खर्चुन बंधारा बांधण्यात आला. परंतु बंधाऱ्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे गळती लागली आहे. जवळपास 18 ते 20 मीटर लांबी असलेल्या बंधाऱ्याचे काम व्यवस्थित करण्यात आलेले नाही. काम निकृष्ट पद्धतीने झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. 

एक मीटरचे सिमेंट खाल्ले
प्रत्यक्ष बांधकामात बंधाऱ्याची उंची तीन मीटरवरून एक मीटरने कमी केल्याचाही आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. मागच्या वर्षी नाल्याला पहिल्यांदा पाणी आले. तेव्हाच बंधाऱ्याखालील गाळ वाहिल्याने पाण्याला बंधाऱ्याखालून वाट मिळाली. परिसरातील शेतकऱ्यांनी दगड मातीची भर पायथ्याजवळ केली. यामुळे काही दिवस पाणी साचले. मात्र दोन- तीन आठवड्यातच पुन्हा गळती सुरू होऊन सर्व पाणी बंधाऱ्याखालून वाहून गेले असल्याचे शेतकरी किसन अहिरे, जितेश अहिरे, दादाजी ठाकरे यांनी सांगितले.

तक्रारीनंतर पाहणीही नाही
यंदा पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे नाल्याला पाणी आलेले असताना निकृष्ट बंधाऱ्यामुळे ते पाणी अडवले जात नसल्याचे चित्र आहे. चिकसेचे उपसरपंच संजय जगताप यांनी महिनाभरापूर्वी साक्री पंचायत समितीचे बांधकाम उपअभियंता महाजन यांना याबद्दल कल्पना दिली. त्यांनी प्रत्यक्ष जागेवर पाहणी करून तीन दिवसात दुरुस्तीचे काम सुरू होईल; असे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी अद्यापपर्यंत कोणीही आले नसल्याचे चिकसेचे उपसरपंच संजय जगताप यांनी सांगितले. चार लाख 88 हजार रुपये खर्चुन बांधकाम केलेल्या या बंधाऱ्यांची साठवण क्षमता तीन टीसीएम असताना बंधाऱ्याच्या खालून पाणी वाहून जात असल्याने तीन लिटर सुद्धा पाणी अडवले जात नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. बंधाऱ्याचे पुनर्मूल्यांकन होऊन त्याची त्वरित दुरुस्ती करून वाया जाणारे पाणी अडविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने याकडे लक्ष पुरवावे,अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे.

 

संपादन : राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule jalyukt shivar ciment bandhara lkwallity work and water lickege