पोटात मृत झाले होत बाळ; तिच्याही वाचण्याची शक्‍यता होती कमीच

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 17 October 2020

प्रसुतीच्या कळा सुरू झाल्‍या. तपासणी केली असता पोटातच बाळाचा मृत्‍यू झाल्‍याचे निदर्शनास आले. यामुळे तिचीही वाचण्याची शक्‍यता तशी कमीच होती. पण मृत्‍यूच्या दारातून ती सुखरूप परतली

धुळे : एका प्रसुत महिलेला मरणाच्या दारातून परत आणण्याचे काम जवाहर मेडिकल फाउंडेशनच्या अतिदक्षता (आय.सी.यू क्रिटीकल केअर टिम) विभागातील डॉक्टरांच्या टिमने करून दाखवले आहे. वेळीच तातडीने उपचार केल्यामुळे सदर महिलेचे प्राण वाचले आहेत. 

काही दिवसांपुर्वीच उडाणे येथील अनिता शिंदे ही वीस वर्षीय महिला रूग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झाली. संबधीत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिची तपासणी केली. त्या अनुषगांने प्रसुतीसाठी तिच्या काही वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. यावेळी संबधीत महिलेच्या पोटातील बाळ गर्भाशयातच मृत झल्याचे निदान झाले. सुरुवातीला नैसर्गिक प्रसुतीसाठी स्रीरोगतज्ञ विभागातील सर्व डॉक्टरांच्या टीमने शर्थीचे प्रयत्न सुरु केले. परंतु ती महिला अत्यवस्थ होत असल्याचे निदशर्नास येताच तिच्यावर तात्काळ शस्रक्रीया करण्यात आली. 

हृदयाची क्रीया पडली बंद
शस्रक्रीयेनंतर अवघ्या काही काळातच त्या महिलेची ऑक्सीजन लेवल कमी होऊन तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. तिचे शरीर कुठलीही प्रतिक्रीया देत नसल्याचे लक्षात येताच संबधीत महिलेस तत्काळ अतिदक्षता विभागात डॉ. रोहन कुलकर्णी यांच्या देखरेखीखाली दाखल करण्यात आले. संपूर्ण शरीरातील अवयव काम करत नसल्याने व श्वास घेण्यास अडचणी येऊ लागल्याने या महिलेस सहा ते सात दिवस व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले. अशा अत्यवस्थ अवस्थेतच तिच्या हृदयाची क्रिया बंद पडली. तेव्हा कुठल्याही क्षणाचा विलंब न लावता अतिदक्षता विभागातील टीमने सीपीआर देऊन त्यांच्या हृदयाची क्रिया पुर्ववत सूरू केली. 

अन्‌ कुटूंबियांचा जीव पडला भांड्यात
अनिता शिंदे या डिससेमिनेटेड इन्ट्राव्हॅस्क्यूलर कोएग्युलेशन (डीआयसी) या अतिशय गंभीर असलेल्या स्टेजमधील रुग्ण होत्या आणि याच गंभीर अवस्थेत असताना त्यांच्यावर उपचार सूरू होते. याप्रकारचे रूग्ण वाचवणे अतिशय दुर्मीळ बा‍ब असून डॉक्टरांच्या सतर्कतेमुळे त्या महिलेस नवीन जीवन मिळाले आहे. यामूळे सदरील महिलेच्या कुटुंबीयांनी जवाहर मेडीकल फाऊंडेशन व तेथील कर्मचाऱ्यांचे आभार मानले. या रूग्णाच्या उपचारासाठी मेडिसीन विभागाचे विभागप्रमुख डॉ.दिलीप पाटील व डॉ.मनजीत शिसोदे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.तसेच संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री रोहिदासजी पाटील, उपाध्यक्ष तथा आमदार कुणाल पाटील, सहसचिव संगीता पाटील, डॉ. ममता पाटील, अधिष्ठाता डॉ. विजय पाटील, उपअधिष्ठाता डॉ.आरती कर्णिक महाले यांनी अतिदक्षता विभागातील सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांचे कौतुक केले. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule javahar medical collage critical women delivery case