कापडण्याहून सुरतला पोहचतो रोज ५० टन मुळा; पाच लाखांची उलाढाल

जगन्नाथ पाटील
Tuesday, 10 November 2020

कापडणे कांदा आणि भाजीपाला उत्पादनात खानदेशात अग्रेसर आहे. येथील भाजीपाल्याला धुळे, शहादा, मालेगाव, वाशी आणि सुरतच्या बाजारात मोठी मागणी असते. येथील भाजीपाला पोचल्यानंतरच लिलावास प्रारंभ होतो.

कापडणे (धुळे) : परिसरात एक महिन्यापासून भाजीपाल्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात निघू लागले आहे. भावही समाधानकारक मिळत आहे. मुळ्याचे विक्रमी उत्पादन निघत आहे. येथून सुरतच्या बाजारात पाच ट्रक मुळा जात आहे. प्रतिकिलो दहा ते पंधरा रुपये दर मिळत आहे. रोज किमान पाच लाखांची उलाढाल होत आहे. त्या बाजारात मुळा चांगलाच भाव खात आहे. 
कापडणे कांदा आणि भाजीपाला उत्पादनात खानदेशात अग्रेसर आहे. येथील भाजीपाल्याला धुळे, शहादा, मालेगाव, वाशी आणि सुरतच्या बाजारात मोठी मागणी असते. येथील भाजीपाला पोचल्यानंतरच लिलावास प्रारंभ होतो. भाजीपाला लागवडीत मुळ्याची लागवड अधिक झाली आहे. दोनशे एकरपेक्षा अधिक क्षेत्रातून मुळा काढणी सुरू आहे. दररोज किमान ५० टक्के मुळा निघत आहे. पाच ट्रक मुळा सुरत बाजारात पोचत आहे. 

सुरतमध्ये मुळ्याला मागणी 
येथील शेतकरी सुरतच्या बाजारात मुळा, मेथी, कोथिंबीर अधिक प्रमाणात नेतात. इतर बाजारपेठांपेक्षा अधिक भाव मिळतो. वाहतूकही वाजवी दरात उपलब्ध आहे. सुरतमध्ये खानदेशी मोठ्या प्रमाणात आहेत. खानदेशी भाजीपाल्यालाच अधिक मागणी असते. येथील भाजीपाला पोचल्यावरच तिथे पहाचे साडेचार-पाचला लिलावास प्रारंभ होतो. विशेष म्हणजे मुळ्याच्या प्रतवारीनुसार अधिक दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. दरम्यान, धुळे जिल्ह्यातील कापडणेसह देवभाने, नगाव, खुडाणे, सायने, नंदाणे, लामकानी, खेडे, नेर व कुसुंबा परिसरातूनही मुळ्याचे उत्पादन वाढले असून, सुरतच्या बाजारात जात आहे. 
 
दोन महिन्यांत मुळ्याचे क्षेत्र रिकामे होते. प्रतिकिलो किमान आठ ते दहा रुपयांचाही भाव मिळाला तरीही परवडतो. एकरी लाखापेक्षा अधिक उत्पादन निघत असते. कांद्यापेक्षा मुळा शेती परवडते. 
- उमाकांत खलाणे, शेतकरी, कापडणे 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule kapdne village daily transport radish in surat