धरणावर मासेमारी करण्यास जायचा रोज...आजही गेला पण 

भरत बागुल
Thursday, 23 July 2020

लाटपाडा धरणात सुकापुर या भागाकडून सुकापुर गावातील एकनाथ वाळू देशमुख (वय 40) हा इसम नेहमीप्रमाणे सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ट्युब टाकून मासेमारी करण्यासाठी गेला होता.

पिंपळनेर (धुळे) : लाटीपाडा धरणात मासेमारी करण्यासाठी नेहमीची सवय होती. धरणाच्या पाण्यात ट्रकच्या चाकाच्या ट्युबमध्ये हवा भरून त्‍यावर बसून मासेमारी करण्याची सवय होती. पण वेळ सांगून येत नाही. असाच प्रकार एकनाथ देशमुख या 40 वर्षीय इसमाबाबत घडला आणि त्‍याला आपला जीव गमवावा लागला.

लाटपाडा धरणात सुकापुर या भागाकडून सुकापुर गावातील एकनाथ वाळू देशमुख (वय 40) हा इसम नेहमीप्रमाणे सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ट्युब टाकून मासेमारी करण्यासाठी गेला होता. हवेचा जोर वाढल्याने सदर तरुणाचा ट्यूबवरून तोल गेल्याने पाण्यात पडला. तोपर्यंत ट्युब त्याच्यापासून लांब गेला होता. त्याने आपला जीव वाचविण्याचा प्रयत्न केला; मात्र धरणाच्या मध्यभागी असल्याने त्याला जिव वाचविता आला नाही. 

दोन तरूणांनी पाहिला सारा प्रकार
एकनाथ देशमुख हे ट्युबवरून खाली पडले आणि खोल पाण्यात बुडतांनाचा सारा प्रकार धरणाच्या काठावर गळ टाकून मासेमारी करणाऱ्या दोन तरुणांनी बघितले. बुडणाऱ्याला वाचविणे देखील त्‍यांना शक्‍य नव्हते. सारा प्रकारा त्‍या तरूणांनी देशमुख यांच्या परिवाराला व गावात नागरिकांना दिली. तोपर्यंत अंधार झाला होता. त्याचा शोध घेणे देखील कठीण झाले होते. यामुळे आज सकाळी आठ वाजेपासून पोहणाऱ्या तरुणांनी शोधाशोध सुरू केली असता दुपारी एक वाजता मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. त्याला बाहेर काढून पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात नेले असता. डॉ. नुक्ते यांनी त्याला मृत घोषित केले. व मृत देह शवइच्छेदन करुन मृत देह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या संबंधी पिंपळनेर पोलीसात अविनाश गंगाराम देशमुख रा. सुकापुर यांनी खबर दिली असुन पोलीसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली. आहे. 

मासेवारीवरच होता उदरनिर्वाह
देशमुख याच्या पश्चात त्याचे वडील, पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. त्याचा उदरनिवार्ह हा मासेमारीवरच चालत होता. परिवारातील कर्ता पुरुष गेल्‍याने परिवार उघड्यावर पडला. यामुळे गावकऱ्यांनी मृतकाच्या नातेवाईकांना मदत मिळावी; म्हणून आमदार मंजुळाताई गावित यांच्याकडे दूरध्वनीद्वारे मदतीची मागणी केली आहे.

 

संपादन : राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news dhule latipada dam Fishing daily but man death